मानसिक ताण आणि शारीरिक आजार
esakal October 19, 2024 10:45 AM

- डॉ. मृण्मयी मांगले, MBBS, Chronic disease reversal expert

आपण गेल्या आठवड्यातील लेखात पाहिल्याप्रमाणे, आपल्यासमोर कोणतेही संकट आल्यावर आपल्या शरीराची निवांत अवस्था कमी होऊन आपल्याला लढण्यासाठी गरजेची ताणयुक्त अवस्था शरीरात निर्माण होते. ही अवस्था खूप महत्त्वाची आहे- कारण यामुळेच आपण संकटकाळी स्वतःचा बचाव करून सुखरूप राहू शकतो.

ताणयुक्त अवस्था आपल्यासाठी महत्त्वाची आहे; पण मग ताणतणावांमुळे आजार का होतात? ताण आरोग्यासाठी हानिकारक आहे असे का म्हटले जाते? याचे उत्तर आहे, की ताण हा संकटसमयी असावा, त्यामुळे लढायला मदत होते. मात्र, संकट गेल्यावर पुन्हा निवांत अवस्था शरीरामध्ये निर्माण व्हायला हवी!... आणि इथेच आपण चुकत आहोत.

आपल्या सर्वांची नेहमीचीच अवस्था निवांतऐवजी ताणयुक्त होऊ लागली आहे. याला वैज्ञानिक भाषेत chronic stress किंवा दीर्घकाळ चालू राहणारा ताण म्हणतात. एका आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संशोधनात आढळून आले आहे, की सत्तर टक्के लोक मानसिक ताण अनुभवत आहेत आणि प्रत्येक चौथ्या व्यक्तीला मानसिक आजार उद्भवण्याची संभावना आहे.

आपली आर्थिक आणि सामाजिक रचना अशी काही झाली आहे, की आयुष्य हा मजा घेत जगण्याचा विषय नसून खूप मेहनत करून मोठी जवाबदारी पार पाडायला हवी अशा पद्धतीने आयुष्य जगले जात आहे. एकमेकांशी केली जाणारी तुलना, आर्थिकदृष्ट्या उत्तमोत्तम वस्तूंचा वाढणारा मोह, विरळ होत चाललेली एकत्र कुटुंबपद्धती आणि भर म्हणून निसर्गापासून तुटत जाणारा माणूस... अशा अनेक गोष्टींमुळे आपल्या ताणाची पातळी भरपूर वाढली आहे. आजकाल लहान मुलांमध्येही ताण वाढत चाललेला दिसतो.

ताण-तणावांमुळे फक्त मानसिक नाही, तर शारीरिक आजारही होतात, ते कसे याबद्दल आपण वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेणार आहोत. मुळात खरेच मन आणि शरीर एकमेकांशी इतके जोडलेले असतात का, की मनावरील ताणामुळे शरीरात बिघाड होऊ शकतील?

आपण ताणयुक्त अवस्थेमध्ये असतो, तेव्हा आपल्या शरीरातही बदल होतात, हे आपण अनुभवले असेल. म्हणजे परीक्षेच्या आधी आपण घाबरलो, तर आपल्या मानबरोबरच शरीरातही बदल होतात. आपला श्वास वाढतो, हृदयाची धडधड वाढते, तोंडाला कोरड पडते इत्यादी. म्हणजे मनाला ताण आल्यावर शरीरावर त्याचे परिणाम दिसतात. मग मनामध्ये सतत ताणयुक्त अवस्था असेल म्हणजेच क्रोनिक स्ट्रेस असेल, तर शरीराला आजार होणार नाहीत का?

आपण दीर्घकाळ मानासिक ताण अनुभवला, तर शरीरामध्ये कॉर्टिसोल नावाचे द्रव्य अतिरिक्त प्रमाणात वाढते. हे द्रव्य आपल्याला लढाईच्या वेळी कमी येत असते. मात्र, शरीरामध्ये हे द्रव्य सतत जास्ती प्रमाणात राहू लागले, तर आरोग्यावर भयानक परिणाम करते. पोटाचे विकार, प्रतिकारशक्ती कमकुवत होणे, विसरभोळेपणा वाढणे, हृदयविकार होणे इतकेच कशाला यामुळे चक्क मेंदूचा आकार कमी झालेला आढळून आला आहे!

दीर्घ ताणामुळे होणारे आजार आणि त्यावरील उपाय आपण पुढील भागात पाहूया.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.