इकडं वारं फिरलंय, जतकरांचं ठरलंय, पडकळर साहेबांना मत; तिकडं विलासरावरांनी सुद्धा हुकमी पान बाहेर काढत शड्डू ठोकला!
कुलदीप माने, एबीपी माझा October 19, 2024 05:43 PM

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : जत विधानसभेला (Jat Vidhan Sabha) भाजपमध्ये बंडखोरीची स्पष्ट चिन्हे आहेत. जतमधील भाजप नेते माजी आमदार विलासराव जगताप यांनी गोपीचंद पडळकर यांना जतमधून उमेदवारी दिल्यास बंडखोरी अटळ असल्याचे संकेत दिले आहेत. काल (18 ऑक्टोबर) विलासराव जगताप यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये त्यांनी जतमधून गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवाराला विरोध केला होता. त्यामुळे जतमधील स्थानिकांना विश्वासात घेऊन भूमिपत्राला उमेदवारी देण्याची मागणी विलासराव जगताप यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मात्र, गोपीचं पडळकर यांना जतमधून उमेदवारी मिळाल्यास विलासराव जगताप यांनी स्वतःसह अन्य कोणाच्या रुपातून बंडखोरी अटळ असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे भाजप समोर डोकेदुखी निर्माण झाली आहे. दुसरीकडे विलासराव जगताप यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्याविरोधात सोशल मीडियात पोस्ट करण्यात आली आहे. यामध्ये विलासराव जगताप यांच्यावरती खोचक हल्लाबोल करण्यात आला आहे. जर राहुल गांधी वायनवाडला जातात. रोहित पवार शेजारच्या अहिल्यानगर जिल्ह्यात जाऊन निवडून येतात, त्यावेळी कोणीच भूमिपुत्राचा मुद्दा काढत नाही. मात्र, गोपीचंद पडळकर दुष्काळी देशाचा सुपुत्र दुष्काळी जनतेला न्याय द्यायला दुष्काळी भागातच चाललेला आहे त्यावर मात्र काही जण उगाचच आक्षेप घेत आहेत. विशेष म्हणजे त्यांना युतीच्या बद्दल बोलण्याचा सुद्धा अधिकार नाही. 

काय म्हटलं आहे पोस्टमध्ये? 

महाराष्ट्रात विधानसभेचे बिगुल वाजलं आणि गोपीचंद पडळकर साहेब जतच्या विकासात दररोज वेगवेगळ्या योजनांमार्फत विकासाचा रतीब घालत आहेत हे पाहून अनेकांच्या पोटात दुखायला लागलं जतच्या दुष्काळी जनतेला उपेक्षित ठेवून राजकारणाची पोळी भाजणाऱ्या या नेत्यांना मग वेगवेगळी कारण आठवू लागली. पण जतच्या जनतेने मात्र विकासाचा दृष्टिकोन बघितला आणि विकासाचा प्रवाह सुद्धा पाहिला.

काल माजी खासदार संजय पाटील यांनी त्यांना पाडण्यासाठी मोदी साहेब, फडणवीस साहेबांच्या विरोधात रात्रीचा दिवस केलेल्या माजी आमदार जगताप यांच्यासह काही लोकांना घेऊन मुंबईला फडणवीस साहेबांना भेटल्याचं आज कुठेतरी वाचनात आलं. मुळात लोकसभेला भाजपाच्या विरोधात काम करणाऱ्या जगताप साहेबांना युतीच्या नेत्यांना भेटण्याचा  अधिकार तरी आहे का? ज्यांनी भाजपाचा पराभव व्हावा यासाठी अहोरात्र मेहनत घेतली त्या विलासराव जगताप यांनी भूमिपुत्राचा मुद्दा काढावा म्हणजे सोयीच्या राजकारणाचा धडा गिरवावा असाच त्याचा अर्थ आहे. 

घटनेत दिलेल्या अधिकारानुसार स्वर्गीय क्रांतिसिंह नाना पाटील साहेब बीडमधून खासदार होतात, राहुल गांधी वायनाड ला जातात, तर रोहित पवार शेजारच्या अहिल्यानगर जिल्ह्यात जाऊन निवडून येतात त्यावेळी कोणीच भूमिपुत्राचा मुद्दा काढत नाही मात्र गोपीचंद पडळकर दुष्काळी देशाचा सुपुत्र दुष्काळी जनतेला न्याय द्यायला दुष्काळी भागातच चाललेला आहे त्यावर मात्र काही जण उगाचच आक्षेप घेत आहेत. विशेष म्हणजे त्यांना युतीच्या बद्दल बोलण्याचा सुद्धा अधिकार नाही. 

जतचा पाणी प्रश्न असेल व  एमआयडीसी असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल या सर्व प्रश्नांवर गोपीचंद पडळकर साहेब मार्ग काढत आहेत म्हणूनच जतच्या जनतेला हा नेता आपला वाटत आहे, 

अरे हा आमचाच पुत्र आहे,
दुष्काळ देशीचा सुपुत्र आहे,
 त्यांचं आणि आमचं एक सूत्र आहे, अन एकच एक गोत्र आहे....

इतर महत्वाच्या बातम्या 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.