IND vz NZ : ऋषभ पंतचा डबल धमाका, कपिल देव यांच्यानंतर धोनीलाही पछाडलं
GH News October 19, 2024 06:10 PM

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. न्यूझीलंडने टीम इंडियाला 46 धावांवर गुंडाळल्यानंतर पहिल्या डावात 402 धावा करत 356 धावांची आघाडी घेतली. टीम इंडियाने तिसऱ्या दिवसापर्यंत 3 विकेट्स गमावून 231 धावा केल्याने 125ने पिछाडीवर होती. विराट कोहली दिवसातील शेवटच्या बॉलवर आऊट झाला. त्यानंतर सर्फराज खानसह ऋषभ पंतने चौथ्या दिवसाची सुरुवात केली. या युवा जोडीने न्यूझीलंड विरुद्ध चिवट खेळी केली आणि टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढलं. या जोडीने टीम इंडियाला 400 पार पोहचवलं. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 177 धावांची भागीदारी केली. सर्फराजने या दरम्यान 150 धावांची अप्रतिम खेळी केली. मात्र सर्फराज त्यानंतर आऊट झाला. तर ऋषभ पंत शतकाच्या दिशेने अग्रेसर आहे.

सर्फराजने या 177 च्या भागीदारी दरम्यान कसोटी क्रिकेटमधील पहिलंवहिलं शतक झळकावलं. तर पंतने कसोटी कारकीर्दीतील 12 वं अर्धशतक ठोकलं. पंतने 56 बॉलमध्ये 50 रन्सचा टप्पा पार केला. पंतच्या या खेळीत 5 चौकार आणि 3 षटकार ठोकले. पंतने यासह 2 माजी भारतीय कर्णधारांना मागे टाकलं. पंतने कपिल देव आणि महेंद्रसिंह धोनी यांना मागे टाकलं.

पंत टीम इंडियाकडून कसोटीत सर्वाधिक षटकार खेचणारा सहावा फलंदाज ठरला. त्यामुळे देव यांची सातव्या स्थानी घसरण झाली. तसेच पंतने अर्धशतकासह कसोटीत 2 हजार 500 धावा पूर्ण केल्या. पंतने अवघ्या 62 डावांमध्ये या 2500 धावा पूर्ण केल्या आणि धोनीला मागे टाकलं. धोनीने 69 डावांमध्ये 2500 धावा पूर्ण केल्या होत्या. पंतने विकेटकीपर म्हणून धोनीचा हा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

कसोटीत वेगवान 2500 धावा करणारे भारतीय विकेटकीपर

ऋषभ पंत – 62 डाव महेंद्रसिंह धोनी – 69 डाव फारुख इंजिनियर – 82 डाव

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टीम साउथी, एजाझ पटेल आणि विल्यम ओरूर्के.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.