स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेचा नवा विक्रम, ‘उदे गं अंबे... कथा साडेतीन शक्तिपीठांची’ मालिकेचा सर्वोच्च टीव्हीआर
जयदीप मेढे October 19, 2024 08:13 PM

Marathi Serial :  स्टार प्रवाहवर (Star Pravah) नुकत्याच सुरु झालेल्या ‘उदे गं अंबे... कथा साडेतीन शक्तिपीठांची’ मालिकेला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. पहिल्या दिवशी 4.5 टीव्हीआर मिळवत 'उदे गं अंबे' ही मालिका टेलिव्हिजनच्या इतिहासात सायंकाळी 6.30 वाजता सर्वोच्च टीव्हीआर मिळवणारी एकमेव मालिका ठरली आहे.

 देवी आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठं ही महाराष्ट्रवासियांची असीम श्रद्धास्थानं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठांपैकी कुठल्या ना कुठल्या देवीचं कुलदेवता म्हणून पूजन केलं जातं. ही आदिशक्ती आईप्रमाणे कुटुंबाचं रक्षण करते. आपल्या कुटुंबासाठी पूजनीय असलेल्या या आईसमान देवीचं महात्म्य आणि इतिहास सविस्तरपणे आणि रोचक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न उदे गं अंबे...कथा साडेतीन शक्तिपीठांची या भव्यदिव्य पौराणिक मालिकेतून करण्यात येत आहे. उदे गं अंबे मालिकेत लवकरच माहुरच्या रेणुकामातेच्या अवताराची गोष्ट पाहायला मिळणार आहे. 

सतीश राजवाडेंनी काय म्हटलं?

सतीश राजवाडे यांनी या मालिकेविषयी बोलताना म्हटलं की, ‘साडे तीन शक्तिपीठे आपली श्रद्धास्थानं आहेत. ही फक्त देवी नाही तर आई आहे सगळ्यांची. अश्या देवी आईची कथा सादर करताना कृतज्ञता वाटतेय. पहिल्या भागापासून प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम पाहून भारावून गेलोय. मोठी जबाबदारी आहे. तिन्हीसांजेला देवी आई घरात येऊन संपूर्ण महाराष्ट्राला आशीर्वाद देत आहे. या मालिकेच्या माध्यमातून नव्या पीढीला या शक्तिपीठांची माहिती आणि घरबसल्या भक्तांना एका यात्रेचा अनुभव मिळत आहे. आपली परंपरा जोपासण्याचा स्टार प्रवाह वाहिनीचा नेहमीच प्रयत्न असते. ही मालिकाही अशीच संस्कार मूल्य आणि करमणुकीची सांगड बांधून सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. 

सुप्रसिद्ध अभिनेता देवदत्त नागे या मालिकेत भगवान शिवशंकर साकारत आहे. उदे गं अंबे कथा साडेतीन शक्तीपीठांची या मालिकेला मिळणाऱ्या प्रेमाविषयी भावना व्यक्त करताना देवदत्त नागे म्हणाले, ‘देवीच्या आशीर्वादामुळेच हा इतिहास घडवू शकलो. मालिकेला भरभरुन प्रेम दिल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राचे आभार. अभिनेत्री मयुरी कापडणे या भव्यदिव्य मालिकेत आदिशक्तीची रुपं साकारत आहे मयुरीची देवीवर प्रचंड श्रद्धा आहे. योगायोगाने कोल्हापुरच्या अंबाबाईचं दर्शन घेत असतानाच मयुरीला आदिशक्तीचं रुप साकारण्यासाठी विचारणा झाली. हा दैवी अनुभव असल्याची भावना मयुरीने व्यक्त केली. 

ही बातमी वाचा : 

Sharad Pawar : मुंबई बॉम्बब्लास्ट, लातूर भूकंप बरीच आव्हानं आलीत, पण माझी सुरुवात या केसने झाली...', 'मानवत मर्डर्स' सीरिजवर शरद पवारांची प्रतिक्रिया

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.