मोठी बातमी! राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना प्रकरणातील तिसऱ्या आरोपीची न्यायलयीन कोठाडीत रवानगी
सदाशिव लाड, एबीपी माझा October 19, 2024 07:43 PM

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed सिंधुदुर्ग: मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा  दुर्घटना प्रकरणातील मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मूर्तिकार आणि सल्लागार हे दोघे सध्या न्यायलयीन कोठडीत आहेत. अशातच आता पुतळ्याच्या जोडणीचे काम करणाऱ्या परमेश्वर रामनरेश यादव या मिर्जापुर उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आलेल्या तिसऱ्या संशयित आरोपीला आज मालवण दिवाणी न्यायालयात हजर केले होते. दरम्यान, न्यायालयाने त्याला न्यायलयीन कोठाडी सुनावली आहे. 

तिसऱ्या आरोपीची न्यायलयीन कोठाडी

दरम्यान, आरोपी परमेश्वर यादव यांच्या बँक खात्याचा तपशील मिळविण्यासाठी तसेच त्याच्याकडे वेल्डिंग करण्याचा परवाना होता का? यासह फोरन्सिक रिपोर्ट गोपनीय असल्याने तो न्यायलायात दिलेला आहे. त्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पुतळा बनवते वेळी मजबुती येण्यासाठी व्यवस्थित वेल्डिंग झालेले नसल्याचे स्पष्ट आहे. या संपूर्ण तपासासाठी चार दिवस पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केली होती. यावर आज न्यायालयाने निर्णय दिला आहे.    

तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार आरोपीकडे मुख्य कामाचा ठेका नव्हता. तसेच आरोपीने थेट आर्थिक व्यवहार केला नाही. पुतळा बनवण्याची जबाबदारी आपटे याच्यावर होती. त्यामुळे तिसरा आरोपी परमेश्वर यादव याच्याकडे हस्तगत करण्यासाठी काही बाकी नसल्याचेही आरोपीचे वकील यांनी म्हटले आहे.

पुतळ्याच्या दर्जाबाबत शंका 

गेल्यावर्षी नौदल दिनाच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मात्र, हा पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळला होता. जयदीप आपटेला इतके मोठे पुतळे उभारण्याचा अनुभव नसतानाही भारतीय नौदलाकडून त्याला हे काम देण्यात आले होते. जयदीप आपटे याला हा पुतळा उभारण्यासाठी 26 लाख रुपये मिळाले होते, असा दावा विरोधकांनी केला होता. उर्वरित चौथरा आणि आजुबाजूच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला होता. मात्र, हा पुतळा अवघ्या आठ महिन्यांत पडल्याने पुतळ्याच्या दर्जाबाबत शंका निर्माण झाल्या होत्या. 

जयदीप आपटे पोलिसांच्या ताब्यात

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनाच्या दिवशी या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. मात्र, 26 ऑगस्टला ब्राँझचा हा 28 फुटी पुतळा कोसळला होता. यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. पुतळा पडल्यानंतर जयदीप आपटे जवळपास 8 दिवस फरार होता. अखेर पोलिसांनी त्याला कल्याणमधील त्याच्या घराबाहेरुन आपटेला ताब्यात घेतले होते.

हे ही वाचा 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.