इस्रायलवर हिजबुल्लाहचा पलटवार, पंतप्रधानांच्या घरावर हल्ला; 7 मिनिटांत डागली 60 क्षेपणास्त्रे
GH News October 19, 2024 09:09 PM

हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसराल्लाह आणि हमासचा प्रमुख याहवा सिनवार यांच्या खात्मा केल्यानंतर ही संघर्ष सुरुच आहे. इस्रायल सध्या या दोन्ही दहशतवादी संघटनेच्या विरोधात कारवाई करत आहे. इस्रायल आणि इराणमधील देखील तणाव कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यातच हिजबुल्लाहने शनिवारी पुन्हा एकदा इस्रायलवर मोठा हल्ला केलाय. इस्रायलची आर्मी आणि आयडीएफने दावा केला आहे की हिजबुल्लाहने 7 मिनिटांत इस्रायलवर 60 क्षेपणास्त्रे डागलीयेत. हिजबुल्लाहकडून 100 हून अधिक क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आलाय. बहुतांश क्षेपणास्त्रे पाडण्यात आली तर अनेक इस्रायलच्या विविध भागातही पडली.

क्षेपणास्त्र हल्ल्यापूर्वी हिजबुल्लाहने ड्रोन हल्लाही केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ड्रोन लेबनॉनमधून लॉन्च केले गेले होते. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सीझेरियामध्ये असलेल्या खाजगी घरापर्यंत ते पोहोचले. खाजगी निवासस्थानाजवळ देखील ड्रोनचा स्फोट झाला. या हल्ल्यानंतर पंतप्रधानांच्या प्रवक्त्याने सांगितले की, नेतन्याहू आणि त्यांची पत्नी या हल्ल्यावेळी तेथे उपस्थित नव्हते.

हिजबुल्लाहचे ड्रोन 70 किलोमीटर अंतरावरून आले होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे इस्त्रायली संरक्षण यंत्रणा या ड्रोनचा शोध लावू शकली नाही. त्यामुळे सुरक्षा अलार्म देखील वाजला नाही. अलार्म न वाजल्याने इस्रायली नागरिकांना बंकरमध्ये जाता आले नाही. मात्र, ड्रोनची तीव्रता कमी असल्याने नुकसान कमी झाले. पंतप्रधान नेतन्याहू यांचे वडिलोपार्जित घरावर हल्ला करण्यात आला. आयडीएफने सांगितले की, हल्ल्याच्या वेळी नेतान्याहू घरी नव्हते. लष्कराने दोन ड्रोन पाडले.

दोन दिवसांपूर्वी इस्रायलने लेबनॉनमध्ये मोठा हल्ला केला होता. ज्यामध्ये सिनवारला ठार केल्याचा दावा केला होता. सिनवार हा इस्रायलवर ऑक्टोबर २०१५ मध्ये झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. हल्ला झाल्यापासून, इस्रायली सैन्य सिनवारच्या मागे लागले होते. शेवटी इस्रायली सैन्याने हल्ल्यात त्याला ठार केलंय.

इस्रायलने हमास आणि हिजबुल्लाह या दोन्ही दहशतवादी संघटनांना संपवण्याची शपथ घेतली आहे. युद्ध त्यांनी सुरु केले पण संपवणार आम्ही असं इस्रायलच्या पंतप्रधानांनी आधीच स्पष्ट केले आहे. पण आता हमास आणि हिजबुल्लाह या दोन्ही संघटनेचे प्रमुख मारले गेले आहेत. त्यामुळे हा संघर्ष थांबावा अशी लोकांची अपेक्षा आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.