CCTV Camera : तिसऱ्या डोळ्याकडे काणाडोळा; शहरातील सीसीटीव्हींची देखभाल दुरुस्ती अपूर्णच
esakal October 20, 2024 01:45 PM

पुणे - प्रभात रस्ता परिसरात चंदनचोरी व दहशत पसरविण्याच्या घटनांसह महिलांवरील अत्याचार, जीवघेणे अपघात, जबरी चोरी, दरोडा यासारख्या गंभीर घटना शहरात घडत आहेत. महत्त्वाच्या ठिकाणी बसवलेले महापालिकेचे सीसीटीव्ही बंद असल्याने पुढील कारवाईला अडचणी येत आहेत. असे असतानाही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखभाल दुरुस्तीबाबत महापालिका प्रशासन गंभीर नसल्याचे वास्तव आहे.

पोर्शे कार अपघात प्रकरण, प्रभात रस्ता परिसरातील चंदनचोरी व दहशत पसरविणारी घटना, बोपदेव घाटासारखी महिलांवरील अत्याचाराची गंभीर घटना यासारख्या अनेक गंभीर घटना मागील काही महिन्यांत घडत आहेत. याबरोबरच रस्त्यांवरील अपघात, वाहनचोरी, जबरी चोरी, दरोडा, वर्दळीच्या ठिकाणी खून, खुनाचा प्रयत्न अशा या घटनांची संख्यादेखील लक्षणीय आहे.

या घटनांवरून शहरात सीसीटीव्हीची किती गरज आहे, हे अधोरेखित होते. दरम्यान, प्रभात रस्ता परिसरातील चंदनचोरी प्रकरणाच्या तपासावेळी तेथील महापालिकेचे सीसीटीव्ही बंद असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यावरून महापालिका प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत किती गंभीर आहे, हेदेखील उघड झाले.

शहराला मोठ्या प्रमाणात सीसीटीव्हींची आवश्यकता असतानाच दुसरीकडे उपलब्ध असलेल्या सीसीटीव्हींची देखभाल दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. महापालिका व पोलिस प्रशासन याबाबत एकमेकांकडे टोलवाटोलवी करत असल्याचे यापूर्वी उघड झाले होते. मात्र महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्यावर पडदा टाकत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरता निधी देत मध्यवर्ती भागातील सीसीटीव्हींची देखभाल दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यास सांगितले होते.

त्यानुसार महापालिकेच्या विद्युत विभागाकडून शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्त्यांवरील सीसीटीव्ही देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र गणेशोत्सव, नवरात्रोत्सव झाल्यानंतर आणि दिवाळी सण तोंडावर आलेला असतानाही सीसीटीव्ही देखभाल दुरुस्तीचे काम अद्याप झाले नसल्याची सद्यःस्थिती आहे.

उर्वरित सीसीटीव्हींचे काय?

शहराच्या वेगवेगळ्या भागांतील सीसीटीव्ही बंद आहेत. त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काय ? सीसीटीव्ही बसविल्यानंतर अडीच ते तीन वर्षे महापालिकेची जबाबदारी आणि त्यानंतर पोलिसांची अशी भूमिका घेत या प्रश्नाबाबत प्रशासनाकडून टोलवाटोलवी केली जात आहे.

सद्यःस्थिती अशी

  • २२८९ - बसविलेले एकूण सीसीटीव्ही

  • १५६२ - दुरुस्तीची मुदत संपलेले

  • ८३७ - देखभाल दुरुस्ती झालेले

  • ७२५ - देखभाल दुरुस्ती आवश्यक

असा झालाय विलंब

  • गणेशोत्सव, नवरात्रीसाठी टाकलेल्या मंडपांचा अडथळा

  • केबल टाकण्यास येणारी तांत्रिक अडचण

  • सीसीटीव्हीसाठी भूमिगत खोदाई करण्याचे काम सुरू

महापालिका आयुक्तांनी मध्यवर्ती भागातील सीसीटीव्ही देखभाल दुरुस्तीबाबत आदेश दिला होता. त्यानुसार बहुतांश ठिकाणी देखभाल दुरुस्ती झाली आहे. काही ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे उशीर होत आहे.

- मनीषा शेकटकर, प्रमुख, विद्युत विभाग, महापालिका

वाहनांनी नियमांचे उल्लंघन केल्यानंतर सीसीटीव्हीतून फोटो काढून लगेच दंड आकारला जातो. मग चोरी, वाहन तोडफोड, जाळपोळ, अपघात, खून अशा गंभीर घटनांवर नियंत्रण आणण्यासाठीही उपयुक्त असणारे त्या-त्या भागातील सीसीटीव्ही सुस्थितीत का ठेवले जात नाहीत. गंभीर घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार आहे का?

- विजय सावंत, नागरिक

शहरातील सीसीटीव्ही बंद आहेत. त्यामुळे चोरीच्या घटना, अत्याचाराचे गुन्हे उघडकीस येण्यास अडथळे येतात. याबाबत तुमच्या प्रतिक्रिया कळवा.याबाबत तुमचे मत नावासह क्यूआर कोड स्कॅन करून किंवा editor.pune@esakal.com या मेलवर, तसेच ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.