लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने चारचाकी लंपास
esakal October 21, 2024 02:45 AM

मंचर, ता. २० : लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने गाडीत बसलेल्या दोघांनी चालकाला कोयत्याचा धाक दाखवत चारचाकी कार व मोबाईल लंपास केल्याची घटना पुणे-नाशिक महामार्गावरील खरपुडी फाटा येथे गुरुवारी (ता. १७) घडली. दरम्यान, प्रसंगावधान राखत शिरोली (ता. खेड) येते चालकाने चालत्या वाहनातून उडी मारत आपली सुटका करून घेतली.याप्रकरणी राजगुरुनगर पोलिसांत दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चालक सचिन दगडू मोरडे (वय ४३, रा. मंचर, ता. आंबेगाव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
सचिन मोरडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ईर्टीगा चारचाकी (एम. एच. १४ के. एन. ३९७०) गुरुवारी ते पुण्याहून मंचरकडे येत होते. संध्याकाळी सहा वाजता चाकण चौक ओलांडल्यानंतर राजगुरुनगरच्या दिशेने येत असताना दोन जणांनी लिफ्ट मागितल्याने मोरडे यांनी गाडी थांबविली. हिंदी भाषेत ‘‘आम्हाला संगमनेरला जायचे आहे. आमच्याजवळ पैसे नाहीत,’’ अशी विनवणी त्यांनी हिंदी भाषेत केली. त्यावर ‘‘तुम्हाला मंचरपर्यंत सोडतो,’’ असे मोरडे यांनी सांगितले. त्यानंतर एक जण मोरडे यांच्या शेजारी तर दुसरा मागील सीटवर बसला. खरपुडी फाटा येथे वीटभट्टीपर्यंत गाडी आल्यानंतर मागे बसलेल्याने ‘‘मला उलटी होते, गाडी थांबवा,’’ असे सांगितल्यामुळे मोरडे यांनी गाडी बाजूला उभी केली. मोरडेही खाली उतरले. त्यानंतर सर्वजण पुन्हा वाहनात बसले. लगेचच पाठीमागे बसलेल्याने मोरडे यांच्या गळ्याला कोयता लावला. मोरडे यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्याबरोबर दुसऱ्याने मोरडे यांचे दोन्ही हात दोरीने बांधले व ड्रायव्हर सीटवरून ओढून मागच्या सीटवर आडवे झोपवले. आरोपींनी मोरडेंच्या खिशातील मोबाईल घेतला. फोन पे, गुगल पेचा पासवर्ड विचारला. परंतु मोरडे यांनी दिला नाही. त्यानंतर एकजण गाडी चालविण्यास बसला. गाडी थोडी पुढे गेल्यानंतर मोरडे यांनी प्रसंगावधान राखून चालू गाडीतून उडी मारली.
सदर भामटे गाडी व मोबाईलसह राजगुरुनगरच्या दिशेने निघून गेले. मोरडे यांनी अन्य वाहनातून जाऊन राजगुरुनगर पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. राजगुरुनगर व चाकण पोलिस तपास करत आहेत. पण रविवारपर्यंत (ता. २०) चोरट्यांचा व वाहनाचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नाही.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.