Pune Metro Fire: नुकत्याच उद्घाटन झालेल्या 'मंडई मेट्रो' स्थानकाला भीषण आग! अग्निशमनच्या पाच गाड्या घटनास्थळी; आग नियंत्रणात
esakal October 21, 2024 07:45 AM

काही दिवसांपूर्वीच उद्घाटन झालेल्या पुण्यातील महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानकाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आगीच्या घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली. या घटनेत मेट्रो स्थानकाचं मोठं नुकसान झालेलं असलं तरी कोणाही व्यक्तीला इजा झालेली नाही. मेट्रोची काम अर्धवट असतानाही उद्घाटनं झाल्यानं अशा घटना घडल्यास प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मेट्रो स्टेशनमधील तळघरात वेल्डिंगचं काम सुरू होतं. त्यामुळं फोम साहित्याला आग लागून मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण झाला. अग्निशामक दलाकडून तातडीनं पाच बंब घटनास्थळी दाखल झालं. जवानांनी श्वसनरहित अग्निशमन उपकरणाचा वापर करत पाणी मारुन पाच ते दहा मिनिटांत आग आटोक्यात आणली. या घटनेत जखमी कोणीही जखमी नसून, आग वेल्डिंगचं काम सुरु असताना लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. Pune Metro Station Fire Latest Marathi News

मेट्रो सेवेवर परिणाम नाही : मुरलीधर मोहोळ

मंडई मेट्रो स्टेशनला आग लागल्याचा दुर्दैवी प्रकार काही वेळापूर्वी घडला होता. आगीची बातमी समजताच पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलाला तातडीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. ही घटना मेट्रोचे प्रवासी कामकाज संपल्यानंतर घडली होती. मेट्रो स्टेशनच्या भागात वेल्डिंगची काम सुरू असताना हा प्रकार घडला. या संदर्भात मेट्रोचे कार्यकारी संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली असून, या घटनेचा मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, असं मेट्रो प्रशासनाकडून कळविण्यात आलं आहे, अशी माहिती खासदार मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.