आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स
esakal October 21, 2024 09:45 AM
भूषण गोडबोले ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार

आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स ही एक आरोग्य, वाहन आदी विविध प्रकारचे विमा संरक्षण देते. ही देशातील खासगी क्षेत्रातील सर्वांत मोठी विमा कंपनी आहे. दोन दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या या कंपनीने तंत्रज्ञानाचा उपयोग करून ग्राहक-केंद्रित पद्धतीने कामकाज करत व्यवसायवृद्धी केली आहे. कंपनीचे डिजिटल धोरण, तंत्रज्ञानआधारित सेवा; तसेच मल्टीचॅनल वितरण नेटवर्क ही स्पर्धात्मक वैशिष्टये आहेत.

कंपनीने मुख्य कार्यप्रणाली क्लाऊडवर स्थलांतरित केली असून, या क्लाऊड-आधारित प्रणालीमुळे अधिक कार्यक्षमता; तसेच गती मिळवली आहे. याशिवाय, ‘आयएल टेककेअर’ अॅपसारख्या तंत्रज्ञानाच्या साह्याने आरोग्य सेवांचा फायदा देऊन, ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यात कंपनी अग्रगण्य ठरली आहे. कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘एलेवेट’ नावाची रिटेल आरोग्य विमा योजना सादर केली आहे.

गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या तिमाही निकालानुसार, सप्टेंबर २०२४ अखेर संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर सुमारे २० टक्के वाढ झाली असून, तो ६९४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आगामी काळातील व्यवसायवृद्धीच्या संभाव्यतेबद्दल कंपनीचे व्यवस्थापन आशावादी आहे. आकडेवारीचा विचार करता कंपनी अंडररायटिंग गुणवत्ता सांभाळत उत्तम प्रकारे व्यवसायवृद्धी करत आहे.

सर्व प्रमुख विभागांमध्ये सातत्याने अग्रणी राहून कंपनीने नियम, स्पर्धात्मक तीव्रता आणि अपेक्षित नुकसान गुणोत्तरांनुसार व्यवसायात बदल करण्याची सक्षमता दर्शविली आहे. इक्विटीवर प्रतिवर्ष सुमारे १५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत ही कंपनी सर्वसाधारण विमा वितरण व्यवसायात प्रगती करत आहे. दीर्घावधीमधील व्यवसायवृद्धीची शक्यता आणि क्षमता लक्षात घेत, जोखीम लक्षात घेऊन या कंपनीच्या शेअरमध्ये मर्यादित प्रमाणात दीर्घावधीच्या दृष्टीने गुंतवणूक करण्याचा जरूर विचार करावा.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.