Ayodhya Case: रामजन्मभूमी खटल्याचा निकाल देण्यापूर्वी सरन्यायाधीश देवासमोर बसून काय म्हणाले? चंद्रचूड यांनी सांगितलं त्यावेळी काय घडलं
esakal October 21, 2024 03:45 PM

Ram Janmabhoomi Case Verdict: अयोध्या प्रकरणात मार्ग कसा शोधायचा हे कळत नव्हते. त्या काळात जेव्हा मी दैनंदिन पूजेला बसायचो, तेव्हा मार्ग तुम्ही शोधून द्या, असे भगवंताला सांगायचो. आपला विश्वास, आस्था असेल, तर देव नेहमी आपल्याला मार्ग शोधून देतो, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी कन्हेरसर (ता. खेड) येथे केले.

सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी आज (ता. २०) खेड तालुक्यातील कनेरसर या त्यांच्या मूळ गावी भेट दिली. कनेरसर ग्रामस्थांनी यमाई मंदिर ट्रस्टच्या कार्यालयात त्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर डॉ. चंद्रचूड यांच्या पत्नी कल्पना दास, खेड सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश ए. एस. सय्यद, श्री यमाई देवस्थान प्रशासक कमिटी अध्यक्ष न्यायाधीश एस. बी. पवार उपस्थित होते.

डॉ. चंद्रचूड म्हणाले, "पूर्वजांचे आणि या कन्हेरसरच्या मातीचे स्मरण नेहमी माझ्या मनात असेल. दररोज सकाळी मी निष्ठेने पूजा करतो. आपल्या परंपरेमुळे, पूर्वजांमुळे मी याठिकाणी येऊ शकलो. कन्हेरसरच्या यमाई देवीच्या कृपेमुळे मी भारताचा सरन्यायाधीश झालो. अयोध्येचे काम आमच्यापुढे आले. त्याकाळात जेव्हा मी दैनंदिन पूजेला बसायचो, तेव्हा मार्ग तुम्ही शोधून द्या, असे भगवंताला सांगायचो."

सवर्वोच्च न्यायालयात काम करत असताना स्त्रियांना त्यांचे हक्क कसे देऊ शकतो, त्यांच्या जीवनासाठी, सशक्तीकरणासाठी काय करू शकतो, यावर मुख्य भर दिला. माझ्या निर्णयामुळे आज स्त्रिया लष्कर, वायुसेना, नौसेना इत्यादी ठिकाणी अधिकारपदांवर काम करत आहेत. देशाच्या सीमेवरही कार्यरत आहेत. भारत विकसित होत असताना स्त्री सशक्तीकरणाची मोठी संधी आपल्याला आहे. ती स्वीकारून आपण स्त्रियांच्या सशक्तीकरणाला वाव द्यावा, असे आवाहन डॉ. चंद्रचूड यांनी केले.

प्रत्येकाने जीवनात एक काहीतरी चांगला मार्ग शोधावा. ज्यामुळे समाज आणि गाव पुढे जाईल, अशी एखादी गोष्ट आदर्श म्हणून करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.