Success Story : मायलेकींनी 5 हजार रुपयांमध्ये सुरु केला व्यवसाय, दर महिन्याला अशी होते लाखोंची कमाई
Times Now Marathi October 21, 2024 03:45 PM

: एखादा नवीन व्यवसाय सुरु करणं आणि त्यात यश मिळवणं, यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. कोणतीही गोष्ट करताना आपल्या वाटेत असंख्य अडचणी येत असतात. पण काही लोक या अडचणींवर मात करत यशाचं शिखर गाठतात. एका मायलेकीच्या जोडीसोबत असंच काहीसं घडलं आहे. एस. हरिप्रियाने तिची आई एस. बानूसोबत व्यवसाय सुरु केला. या व्यवसायातून या दोघी जणी लाखोंची कमाई करत आहेत.

एस. हरिप्रियाने तिच्या आईच्या साथीने खेळण्यांच्या विक्रीचा व्यवसाय ऑनलाईन सुरु केला. या दोघींनी सुरुवातीला 5 हजार रुपये गुंतवून या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. मुलांच्या मेंदूला चालना देणारी खेळणी विकायला त्यांनी सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या ऑनलाईन स्टार्टअपला एक्स्ट्रोकिड्स () असं नाव दिलं. सध्या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 5 हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. दर महिन्याला त्यांना 15 हजारपेक्षा जास्त ऑर्डर्स मिळतात.

कशी सुचली कल्पना ?आपल्या मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी काय करावं, असा प्रश्न सगळ्या पालकांना पडलेला असतो. मुलं चालायला लागल्यानंतर पालकांना त्याला एका ठिकाणी बसवून ठेवण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागतात. मुलांना मोबाईल किंवा टीव्हीची सवय लागू नये, असं पालकांना वाटत असतं. त्यांच्या ज्ञानात भर पडेल, अशी गोष्ट ते शोधत असतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन दोन मुलांची आई असलेल्या एस. हरिप्रियाने मुलांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवणाऱ्या खेळण्यांच्या व्यवसाय सुरु केला. तिने एक्स्ट्रोकिड्सची स्थापना केली.

दोन मुलांना सांभाळत व्यवसाय करणं थोडं अवघड होतं. पण तिच्या आईने तिला खूप मदत केली. हरिप्रियाची आई या व्यवसायाशी जोडली गेली. हरिप्रियाच्या आईचं या व्यवसायात महत्त्वाचं योगदान आहे.

हरिप्रियाच्या मते, तुम्ही सातत्याने प्रयत्न करत राहणं, आवश्यक आहे. हरिप्रियाला तिच्या पहिल्या ऑर्डरसाठी अनेक महिने वाट बघावी लागली. सुरुवातीला हरिप्रियाचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं. पण सध्या चित्र वेगळं आहे. हरिप्रिया 500 पेक्षा जास्त प्रकारच्या खेळण्यांची विक्री करते. तिने आजपर्यंत 5 लाखांपेक्षा जास्त ग्राहकांना खेळणी विकली आहेत.

हरिप्रियाने सांगितलं की, एक काळ असा होता जेव्हा तिच्याकडे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही पैसे नव्हते. त्यानंतर हरिप्रियाच्या मनात एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्याचा विचार आला. खास खेळण्यांसोबत कसं खेळावं, हे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं होतं. या व्हिडिओत हरिप्रियाची आईदेखील होती. या व्हिडिओला 60 हजारपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले. या व्हिडिओनंतर सगळी परिस्थिती बदलली.

वार्षिक कमाईहरिप्रियाची दर महिन्याची कमाई 3 लाख रुपयांच्या आसपास आहे. तिच्याकडे 49 रुपयांपासून 8,000 रुपयांपर्यंतची खेळणी आहेत. पझल्स, मेमरी कार्ड गेम्स आणि शट द बॉक्स ही हरिप्रियाची बेस्टसेलर खेळणी आहेत.


© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.