रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक, दोन तास काय खलबतं?
GH News October 21, 2024 04:15 PM

महायुतीत आता मनसेला काही जागांवर बिनशर्त पाठिंबा देणार असल्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तब्बल दोन तास खलबतं झाली आहेत. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शनिवारी या तिनही नेत्यांमधील बैठकीत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाली. तर काही निवडक जागांवर महायुती राज ठाकरे यांना बिनशर्त पाठिंबा देण्याची शक्यता आहे. यासंदर्भात देखील या बैठकीत चर्चा झाली. दरम्यान, शिवडी, वरळी, माहीमसह काही जागांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे हे नागपुरातून शनिवारी रात्री 12 वाजता मुंबईत आले. रात्री 12 वाजता देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचा ताफा मुंबई विमानतळावरून निघाला. या दोनही नेत्यांच्या वाहनांचा ताफा हा वरळीपर्यंत आला. नंतर हा ताफा अज्ञातस्थळी गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील ठाण्याहून मुंबईच्या दिशेने निघाला. मध्यरात्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली. या तीन नेत्यांमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाली. राज ठाकरेंसोबत झालेल्या गुप्त बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस पहाटे तीन वाजता सागर बंगल्यावर गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील तीन वाजता वर्षा बंगल्यावर पोहोचले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.