Kudal Vidhan Sabha 2024 : सिंधुदुर्गात वारं बदललं, एकदा हे वाचा, निलेश राणेंकडे मोठी संधी
GH News October 21, 2024 04:15 PM

महाराष्ट्रातील कोकण प्रांत म्हणजे निसर्गाने समृद्ध असलेला प्रदेश. निसर्गाने कोकणाला भरभरुन दिलय. अलिबागपासून सुरु होणाऱ्या कोकणाच सौंदर्य पहिल्या नजरेतच तुम्हाला प्रेमात पाडतं. एकाबाजूला निळाशार अंथाग पसरलेला समुद्र आणि दुसऱ्याबाजूला पश्चिम घाटातील डोंगर रांगा. कोकणाच हेच सौंदर्य पाहून आतापर्यंत अनेकदा कोकणचा कॅलिफोर्निया करणार असं म्हटलं गेलय. अलिबागपासून सुरु होणाऱ्या कोकणाच टोक म्हणजे सावंतवाडी. त्यानंतर सुरु होते ती गोव्याची सीमा. कोकणाची आणखी एक ओळख म्हणजे हापूस आंबा. खासकरुन रत्नागिरी-देवगडच्या हापूस आंब्याच आज जगात स्वत:च एक वेगळ स्थान आहे. पूर्वी कोकणी माणसाच उपजिवीकेच मुख्य साधन होतं, शेती आणि मासेमारी. पण आज कोकणी माणूस अन्य क्षेत्रात सुद्धा तितकाच यशस्वी आहे. अनेक फळ प्रक्रिया, बागायती उद्योग कोकणात स्थिरावले आहेत.

कुठेही कोकणाच्या राजकारणाचा विषय निघाला की, ती चर्चा राणे या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा हा नारायण राणेंचा बालेकिल्ला. राणेंच्या राजकारणावर लिहिण्याआधी थोडा कोकणचा राजकीय इतिहास समजून घेऊया. नारायण राणेंआधी बॅरिस्टर नाथ पै आणि मधु दंडवते यांनी लोकसभेवर कोकणच नेतृत्व केलं. उच्चशिक्षित, सुस्कृंत राजकारण अशी या दोन्ही नेत्यांची ओळख. आज कोकण रेल्वेमुळे लाखो लोकांचा प्रवास सुसह्य झाला. रोजगार निर्मिती झाली. त्याचं सर्व श्रेय जातं, मधु दंडवते यांना. मधु दंडवतेंमुळे कोकण रेल्वेच स्वप्न साकार होऊ शकलं. स्वत:हा नारायण राणे यांनी नेहमीच या दोन्ही नेत्यांच भरभरुन कौतुक केलय. 90 च्या दशकाआधी कोकणावर काँग्रेस, समाजवादी विचारसरणीचा प्रभाव होता. पण 90 च्या दशकानंतर कोकणात शिवसेनेची ताकद वाढू लागली.

2024 मध्ये सिंधुदुर्गात राजकीय चित्र बदलणार

नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत असलेला कोकणी माणूस हा शिवसेनेचा पारंपारिक, हक्काचा मतदार. त्यामुळे कोकणावर खासकरुन रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यावर त्याचा प्रभाव पडणं स्वाभाविक होतं. 90 च्या दशकात दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कोकणात शिवसेना वाढवण्यासाठी नारायण राणे यांना पाठवलं. राणेंनी सुद्धा स्वत:ला झोकून देत कोकणात शिवसेना वाढवली. पुढे 2004 नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील समीकरणं बदलली. 2004 ते 2014 अशी दहा वर्ष सिंधुदुर्गात शिवसेनेला संघर्ष करावा लागला. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणावर नारायण राणेंची पकडच अशी होती. पुढे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत निलेश राणे यांचा पराभव झाला आणि आकुंचन पावलेला ठाकरे गट वाढला. आता 2024 नंतर पुन्हा रत्नागिरी-सिंधुदुर्गातील समीकरणं बदलणार अशी स्थिती आहे.

राणेंकडून पराभवाची सव्याज परतफेड

विधानसभा निवडणूक 2024 च्या निमित्ताने आपण कुडाळ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊया. कुडाळ विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात येतो. विधानसभेच गणित समजून घेण्याआधी चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल समजून घ्यावा लागेल. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्याचा मिळून आता एकच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ आहे. 2008 साली मतदारसंघ पूनर्रचनेनंतर हा लोकसभा मतदारसंघ तयार झाला. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये या मतदारसंघातून नारायण राणे यांनी बाजी मारली. त्यांनी सलग दोन टर्मपासून खासदार असलेल्या विनायक राऊत यांचा पराभव केला. नारायण राणेंनी हा विजय मिळवून मुलाच्या पराभवाची सव्याज परतफेड केली. 2014 साली काँग्रेसच्या तिकीटावर लढणाऱ्या निलेश राणे यांना, विनायक राऊत यांनी पराभूत केलं होतं.

मतदारसंघ पूनर्रचनेनंतर पहिल्या निवडणुकीत काय झालं?

मतदारसंघ पूनर्रचनेनंतर झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे यांनी बाजी मारली. त्यांनी शिवसेनेच्या सुरेश प्रभू यांचा पराभव केला.

काँग्रेसच्या निलेश राणे यांना एकूण 353,915 मतं मिळाली.

प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेचे सुरेश प्रभू यांना 307,165 मतं मिळाली.

निलेश राणे यांनी 46 हजार पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला.

2014 मध्ये राणेंना धक्का

2014 च्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार विनायक राऊत यांनी निलेश राणेंचा पराभव केला.

विनायक राऊत यांना एकूण 493,088 मतं मिळाली.

काँग्रेसच्या निलेश राणे यांना 343,037 मतं मिळाली.

2014 मध्ये विनायक राऊत यांनी निलेश राणेंना दीड लाखापेक्षा पण जास्त मतांनी पराभूत केलं.

पुन्हा विनायक राऊतच सरस

2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा विनायक राऊत अजिंक्य ठरले.

शिवसेनेच्या विनायक राऊत यांना 458,022 मतं मिळाली.

निलेश राणे यांना 2,79,700 मतं मिळाली.

विनायक राऊत यांनी सलग दुसऱ्यांदा मोठ्या फरकाने विजय मिळवला.

2024 लोकसभा निवडणुकीत नारायण राणे जिंकले, पण….

भाजपाने राज्यसभेतल्या आपल्या खासदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्गातून उतरवण्यात आलं.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही शिवसेनेची पारंपारिक जागा. पण शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर राणेंच मतदारसंघातील राजकीय वजन लक्षात घेऊन शिंदे गटाने ही जागा भाजपासाठी सोडली.

भाजपाच्या तिकीटावर पहिल्यांदाच खासदारकीची निवडणूक लढवणाऱ्या नारायण राणेंनी 47 हजार मतांच्या फरकाने विनायक राऊत यांना पराभूत केलं.

नारायण राणे यांना 4,48,514 मतं मिळाली.

विनायक राऊत यांना 4,00656 मतं मिळाली.

नारायण राणे यांनी 2 लाखापेक्षा जास्त मताधिक्क्याने विजयी होण्याचा दावा केला होता. पण रत्नागिरीत महायुतीची ताकद दिसली नाही. परिणामी नारायण राणे यांना खूप मोठं मताधिक्क्य मिळवता आंल नाही. पण सिंधुदुर्गात म्हणजे बालेकिल्ल्याने पुरेपूर साथ दिली. सिंधुदुर्गातील लोकसभेचे आकडे महायुती खासकरुन राणेंचा आत्मविश्वास वाढवणारे आहेत.

2024 लोकसभा निवडणूक निकाल

मालवणमधून फक्त नारायण राणेच

आता कुडाळ विधानसभा मतदारसंघाकडे वळूया. कुडाळ आणि मालवण या दोन तालुक्यांचा मिळून 2008 नंतर कुडाळ विधानसभा मतदारसंघ तयार झाला आहे. त्याआधी मालवण विधानसभा मतदारसंघ होता. 1990 पासून 2014 पर्यंत सतत नारायण राणेच या मतदारसंघातून विजयी झाले. पण 2014 ला चित्र पालटलं. काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीधर नाईक यांचे पुतणे वैभव नाईक जायंट किलर ठरले. त्यांनी नारायण राणे यांचा 10 हजारपेक्षा जास्त मतांनी पराभव केला.

पहिल्यांदा वैभव नाईक अपयशी

नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर 2007 साली वैभव नाईक यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्याने ठाकरेंच्या शिवसेनेच काम सुरु केलं. राणेंच्या वर्चस्वाला आव्हान दिलं. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना नारायण राणेंविरुद्ध अपयश आलं. पण 2014 च्या विधानसभा निवडणुकीत या पराभवाची त्यांनी परतफेड केली. राणेंनी देसाईंना बळ देऊनही फायदा झाला नाही.

2009 विधानसभा निवडणूक निकाल

2019 च्या विधानसभा निवडणुकीतही वैभव नाईकच जिंकले. यावेळी नारायण राणे यांनी अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांच्यामागे बळ उभं केलं. पण वैभव नाईक यांनी 14 हजारपेक्षा जास्त मतांच्या फरकाने विजय मिळवला.

2014 विधानसभा निवडणूक निकाल

2019 विधानसभा निवडणूक निकाल

किती वर्षांनी पुन्हा राणे कुटुंबातील व्यक्ती धनुष्यबाण चिन्हावर लढणार ?

आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र चित्र वेगळं असणार आहे. कारण यावेळी वैभव नाईक यांच्यासमोर राणे कुटुंबातूनच आव्हान असणार आहे. निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी केली आहे. कुडाळ ही पारंपारिक शिवसेनेची जागा राहिली आहे. लोकसभेला एकनाथ शिंदेंनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा भाजपाला दिली. पण विधानसभेला ते असं करणार नाही असं दिसतय. त्यामुळेच निलेश राणे शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेऊन ही निवडणूक लढवू शकतात. मागच्या दोन दिवसात या संदर्भात हालचाली सुद्धा वाढल्या आहेत. नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. येत्या एक-दोन दिवसात निलेश राणे यांचा शिवसेना पक्षप्रवेश होईल असं बोलल जातय. निलेश राणे शिवसेनेत गेल्यानंतर जवळपास 20 वर्षांनी राणे कुटुंबातील व्यक्ती पुन्हा धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. शेवटचे 2004 साली नारायण राणे धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढले होते.

निलेश राणे आता खूप बदलले

कुडाळ विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र चव्हाण इच्छुक असल्याच बोललं जात होतं. पण ग्राऊंड लेव्हलला राणेंच वजन आहे. निलेश राणे यांनी कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात संघटनात्मक बांधणी केली आहे. “10 वर्षापूर्वीचे निलेश राणे आणि आताचे निलेश राणे यात खूप फरक पडलाय. निलेश राणे स्वत: मतदारापर्यंत, कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचले आहेत. त्यांच्या समस्या समजून घेतल्या. शक्य आहे ते प्रश्न मार्गी लावले. लोकसभा निवडणुकीतच्या निकालात त्याचा प्रत्यय आला. लोकसभेला कुडाळ विधानसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना 26 हजारच मताधिक्क्य मिळालं. वैभव नाईक यांच्यासाठी यंदाची निवडणूक अजिबात सोपी नाहीय. वैभव नाईक यांचा जनसंपर्क तगडा आहे. पण निलेश राणेंनी यावेळी एकदम भक्कम बांधणी केली आहे” असं सिंधुदुर्गातल्या पत्रकाराने सांगितलं.

वैभव नाईक यांच्या विरोधात जाणारे मुद्दे कुठले?

राणे कुटुंबाच्या दादागिरीचा मुद्दा मांडून वैभव नाईक 2014 साली पहिल्यांदा निवडणूक जिंकले. अजूनही तो तेच मुद्दा मांडत आहेत. पण कुडाळ विधानसभा मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत. कुडाळ एमआयडीसीत अनेक कारखाने बंद आहेत. पर्सनेट, एलईडी सारखे मच्छीमारांचे प्रश्न आहेत. आंबा, काजू बागायतदारांच्या अडचणी आहेत. तारकर्ली, देवबाग येथे पर्यटन व्यावसायिकांचे प्रश्न आहेत. “वैभव नाईक आमदार झाल्यानंतर साडेसात वर्ष सत्तेत आहेत. पण त्यांना विधानसभा क्षेत्रासाठी निधी आणता आला नाही. सत्ता असूनही हे प्रश्न मार्गी लावता आले नाहीत. उलट सी वर्ल्ड सारख्या प्रकल्पांना विरोध केला. हेच सगळं त्यांच्या विरोधात जाणारं आहे” असं स्थानिक पत्रकाराने सांगितलं. त्यामुळे सिंधुदुर्गात यावेळी वातावरण नारायण राणेंना अनुकूल आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.