Uddhav Thackeray: ठाण्यातील 'या' 11 विधानसभांवर ठाकरे गटाचा दावा, निष्ठावंतांना मिळणार संधी
esakal October 21, 2024 10:45 PM

Thane Latest News: बंडखोरीनंतर हातातून निसटलेला ठाणे जिल्हा पुन्हा काबीज करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने आक्रमकपणे विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा निश्चय केला आहे. यासाठी जागावाटपात मुंबईनंतर ठाण्यात ठाकरे गट मोठा भाऊ म्हणून महाविकास आघाडीतील सर्वाधिक जागा लढणार असल्याचे समजते.

१८ पैकी जवळपास ११ जागांवर ठाकरे गटाने दावा केला आहे. यासाठी उमेदवारांच्या नावांची चाचपणी झाली आहे. एखाद्या ठिकाणी आयात उमेदवार असेल, पण कठीण काळातही ठाकरेंची साथ न सोडणाऱ्या निष्ठावंतांना प्रथम प्राधान्य देण्याचा प्रयत्न असणार आहे.

ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. २००९ पर्यंतच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक आमदार शिवसेनेचे निवडून येत होते. पण त्यानंतर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांची झालेली फेररचना आणि २०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेत शिवसेनेच्या बालेकिल्ल्याचा एक एक बुरूज ढासळू लागला.

तरीही महापालिकांवर शिवसेनेने आपली पकड कायम ठेवत ठाणे जिल्हा भक्कम ठेवण्याचा प्रयत्न केला. २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हे आव्हान दुपटीने वाढले आहे. कारण, या वेळी निवडणुकीला सामोरे जाताना एकसंध असलेल्या शिवसेनेचे दोन गट झाले आहेत. हे दोन्ही गट ताकदीनिशी निवडणुका लढवणार आहेत. त्यापैकी शिवसेना शिंदे गटाचे वजन जास्त आहे.

विद्यमान पाचही आमदार शिंदे गटाकडे आहे. याशिवाय ठाणे, कल्याण हे दोन लोकसभा शिवसेना शिंदे गटाकडे आहेत. त्या तुलनेत ठाकरे गटाची झोळी रिकामी आहे. कोणतेही संवैधानिक पद ठाकरे गटाकडे नाही. अशा परिस्थितीतही महाविकास आघाडीच्या माध्यमातून ठाकरे गट आपली ताकद पुन्हा मिळवण्याची धडपड या निवडणुकीत करणार आहे. यासाठी जागावाटपाची रणनीती तयार करण्यात आली आहे. शिवसेनेचे पारंपरिक मतदारसंघ आणि निवडणून येणाऱ्या उमेदवारांची चाचपणी केल्यानंतर ११ जागांवर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे.

दावा असलेले मतदारसंघ

ठाणे, ओवळा-माजिवडा, ऐरोली, कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व, अंबरनाथ, भिवंडी ग्रामीण, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, डोंबिवली, शहापूर या मतदारसंघांवर शिवसेना ठाकरे गटाचा दावा आहे. यापैकी शहापूर विधानसभा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे.

कोपरी-पाचपाखाडीत काँग्रेस

महाविकास आघाडीच्या जागावाटपात पारंपरिक मतदारसंघ पक्षांना सोडण्यावर भर आहे. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेला कोपरी-पाचपाखाडी येथे दोन शिवसेनेत लढत होईल, अशी शक्यता वर्तवली जात असताना ही जागा काँग्रेसला सुटू शकते, तर मिरा-भाईंदरची जागाही काँग्रेसच्या पारड्यात जाण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटातील चर्चेतील नावे

ठाण्यातून माजी खासदार राजन विचारे यांना शिवसेना ठाकरे गट निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. ओवळा-माजिवडा येथे प्रताप सरनाईक यांना आव्हान देण्यासाठी नरेश मणेरा यांचे नाव आघाडीवर आहे. कल्याण ग्रामीणमध्ये माजी आमदार सुभाष भोईर यांना संधी मिळेल. भिवंडी पूर्वेत माजी आमदार रुपेश म्हात्रे, ऐरोली येथे एम. के. मढवी रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. डोंबिवलीत नुकतेच शिंदे गटातून आलेले दीपेश म्हात्रे यांच्या नावाची चर्चा आहे.

शिवसेना शिंदे गटाचे आव्हान

२०१९ मध्ये एकसंध शिवसेनेने नऊ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी कोपरी- पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, अंबरनाथ, भिवंडी ग्रामीण, कल्याण पश्चिम या पाच जागांवर शिवसेनेला यश मिळाले. कल्याण ग्रामीणमध्ये आयत्यावेळी उमेदवार बदलल्याचा फटका बसला. शहापूरमध्ये आयात उमेदवारामुळे जागा गमवावी लागली. भिवंडी पूर्वेत भाजपच्या बंडखोरीने शिवसेनेला पराभवाला सामोरे जावे लागले.

कळवा-मुंब्रात आव्हाडांसमोरचे आव्हान टिकले नाही. या वेळी स्थिती थोडी वेगळी आहे. काही अपवाद वगळता शिवसेनेच्या हक्काच्या मतदारसंघावर दोन्ही शिवसेना आमने-सामने असणार आहेत. मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांची या जिल्ह्यावर असलेली पकड पाहता ठाकरे गटासमोर मोठे आव्हान आहे. या वेळी सत्ता विरुद्ध निष्ठा, असा सामना रंगवण्याचा प्रयत्न झाला तरी या कार्डसह ठाकरे गटाला गमिनीकाव्याने रणनीती आखावी लागणार आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.