मतदारांची नावे गायब केलेल्या तक्रारींची 13 जिल्ह्यांत चौकशी, महाविकास आघाडीच्या मागणीची निवडणूक आयोगाकडून दखल
Marathi October 22, 2024 08:25 AM

राज्यातल्या तेरा मतदारसंघांतील महाविकास आघाडीच्या मतदारांची नावे वगळण्याच्या महाविकास आघाडीच्या तक्रारीची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून यामध्ये दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान तुळजापूर मतदारसंघात एकाच आधार कार्डच्या सहाय्याने साडेसहा हजार बोगस मतदार नोंदणीचा प्रकार निवडणूक आयोगाने उघडकीस आणला आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मताधिक्य मिळालेल्या मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या मतदारांची नावे फॉर्म सातच्या माध्यमातून वगळली जात असल्याची तक्रार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याकडे केली होती. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार अनिद देसाई व महाविकास आघाडीच्या अन्य नेत्यांनी चोक्कलिंगम यांची भेट घेतली.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दहा हजार बोगस मतदार घुसवल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला होता त्याशिवाय लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने चौदाहून अधिक मतदारसंघातील हजारो मतदारांची नावे वगळल्याचा आरोप केला. शिर्डी, चंद्रपूर, आर्वी, कामठी, कोथरूड, गोंदिया, अकोला पूर्व, चिखली, नागपूर, कणकवली, खामगाव, चिमूर, धामणगाव रेल्वे व अन्य काही विधानसभा मतदारसंघातील नावे वगळल्याची यादीच निवडणूक आयोगाला सादर केली होती.

अचूक तक्रार देण्याचे आवाहन

कोणत्याही मतदारसंघात नियमबाह्य पद्धतीने नाव नोंदवण्याचे किंवा नावे वगळण्याचे फाँर्म मोठ्या संख्येने एकत्रितपणे दिल्याची तक्रार करायची असेल तर मतदारसंघ आणि अचूक पोलिंग स्टेशन सांगावे. ते आम्ही तपासू आणि यंत्रणेकडून जर चूक झाली असेल तर संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिला आहे.

साडेसहा हजार बोगस मतदार नोंदणीचा प्रयत्न

महाविकास आघाडीने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोग एकदम अलर्ट मोडवर आला आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात मागील काही काळात अचानक नवीन मतदार नोंदणीसाठी आँनलाईन अर्ज दाखल झाल्याचे निवडणूक आयोगाच्या लक्षात आले. मतदान नोंदणीसाठी बनावट आधारकार्ड जोडल्याचे लक्षात आले. एकाच आधारकार्डवर किमान साडे सहा हजार बोगस मतदार नोंदवण्याचा प्रकार निवडणूक आयोगानेच उघडकीस आणला आहे. मतदारसंघात बोगस नोंदणीचा डाव निवडणूक आयोगाने उधळून लावला. या प्रकरणी धाराशीव पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. या मागे मास्टरमाईंड कोण आहे याचा तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले पण या प्रकारामुळे मात्र खळबळ माजली आहे.

प्रत्येक पोलिंग स्टेशनची पडताळणी

महाविकास आघाडीने जी नावे दिली आहेत त्या नावांची यादी त्या मतदारसंघाच्या जिल्हाधिकाऱ्यांना व मतदारसंघातील निवडणूक कार्यालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांना पाठवली आहे. याची चौकशी सुरु असल्याचे आयोगातील अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रत्येक मतदारसंघात सरासरी साडेतीनशे पोलिंग स्टेशन आहेत. त्याची तपासणी करण्याचे काम सुरू झाले आहे. नावे वगळली गेली असली तरी नाटीस दिली होती काय याची तपासणी सरू झाली आहे, पण त्याला काही कालावधी लागेल असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.