आंतरवाली सराटीत मध्यरात्रीच्या गाठीभेटी सुरुच, शरद पवार गटाचा नेता आणि दानवेंचा विरोधक मनोज जरांगेंच्या भेटीला
रवी मुंडे, एबीपी माझा October 22, 2024 11:13 AM

Jalna: विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) बिगुल वाजल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी निवडणुकीची आपली भूमिका जाहीर केली आहे. राज्यातील काही निवडक मतदार संघात आपण उमेदवार जाहीर करणार असे म्हणत मराठा आरक्षणासंदर्भात 500 रुपयांच्या बॉण्डवर जो लिहून देईल त्याला पाठिंबा देणार असल्याचे सांगितल्यानंतर अंतरवली सराटीत उमेदवारांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार आणि दानवेंचे विरोधक समजले जाणारे चंद्रकांत दानवे  मनोज जरांगे यांच्या भेटीला आल्याचे वृत्त आहे. 

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी सोमवारी रात्री अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. दोघांमध्ये रात्री चर्चा सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. चंद्रकांत दानवे हे जालन्यातील भोकरदन मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. 

आंतरवली सराटीत मध्यरात्रीच्या गाठीभेटी सुरूच 

जरांगे पाटील यांच्या घोषणेनंतर आंतरवली सराटीत मध्यरात्रीच्या गाठीभेटी वाढल्याचे दिसून येत आहे. 500 रुपयांच्या बॉण्डवर लिहून देत येणाऱ्या उमेदवारांची संख्या ही वाढल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांच्या विरोधात चंद्रकांत दानवे हे भोकरदन विधानसभेतून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. दरम्यान बाँड घेऊन जरांगेंकडे येणाऱ्या उमेदवारांना त्यांनी एक आवाहन केलं आहे.

मनोज जरांगे उमेदवार देणार नाहीत

तरवाली सराटीत 500 रुपयांच्या बाँडवर लिहून देत उमेदवार पोहोचत आहेत. त्यावर, आता मनोज जरांगे यांनी महत्त्वाचं आवाहन केलंय. जरांगे पाटील यांच्या घोषणेनंतर त्यांच्याकडे 500 रुपयांच्या बाँडवर लिहून देत येणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढली आहे. ज्या मतदारसंघात मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उमेदवार देण्यात येणार नाही, त्या मतदारसंघातील इतर पक्षाच्या उमेदवारांकडून (Vidhansabha Election) बाँडवर लिहून घेतलं जाणार आहे. त्यामुळे, सध्या बाँड घेऊन अंतरवाली सराटी येथे जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने मनोज जरांगे यांनी बाँड घेऊन येणाऱ्या उमेदवारांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. 

उमेदवाराचे मेरीट तपासणार

तुम्ही थेट बाँड घेऊन आमच्याकडे येऊ नका, सध्या काय व्हायलयं कुणीही 500 रुपयांचा बाँड घेऊन आमच्याकडे यायलंय. त्यामध्ये, एखाद्याकडे पैसे नसतील तर तो उसने पैसे घेऊन 500 रुपयांचा बाँड घेऊन लिहून देतोय. मराठ्यांचं मतदान आहे, म्हणून तुम्ही उगाच बाँड लिहित बसायचं असं करु नका. अगोदर आमच्याशी संपर्क करा, किंवा येऊन भेटा. जिथं आम्ही उमेदवार देणार नाहीत, तिथं कुठल्या पक्षाचा असेल किंवा अपक्ष उमेदवार असेल त्याचे मेरीट आम्ही तपासणार आहोत. समजा एखाद्याने आम्हाला बाँडवर लिहून दिलं नाही तर त्या मतदारसंघातील अपक्ष किंवा तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा जाहीर करू, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले. 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.