Omar Abdullah : उमर अब्दुल्ला यांनी घेतली काश्मिरी भाषेतून शपथ
esakal October 22, 2024 11:45 AM

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांनी सोमवारी सभागृहाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष मुबारक गुल यांनी सर्व सदस्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी काश्मिरी भाषेत शपथ घेतली.

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचे पुत्र असलेले उमर आणि त्यांची पत्नी यांना स्थानिक काश्मिरी, उर्दू आणि हिंदी भाषा व्यवस्थित बोलता येत नसल्याने त्यांच्यावर अनेकदा टीका झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर उमर यांनी काश्मिरी भाषेतून शपथ घेतल्याचे मानले जात आहे. उमर यांची पत्नी मोली या मूळच्या ब्रिटिश नागरिक असल्याने त्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व आहे.

त्याचप्रमाणे उमर यांचेही इंग्रजीवर चांगले प्रभुत्व असल्याचे मानले जाते. २००९ ते २०१४ या कालावधीमध्ये त्यांनी काश्मिरी, उर्दू आणि हिंदी या भाषांचे विशेष प्रशिक्षण घेतले होते. दरम्यान सोमवारी झालेल्या शपथविधीमध्ये जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदरकुमार चौधरी यांनी इंग्रजीमधून शपथ घेतली.

५१ नवे आमदार

यंदाच्या जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ५१जण हे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. यापैकी भाजपच्या किश्तवाडच्या आमदार शगुन परिहार या सभागृहातील सर्वांत तरुण आमदार असून त्या २९ वर्षांच्या आहेत. तर नॅशनल कॉन्फरन्सचे चरार ए शरिफचे आमदार अब्दुल रहीम राथेर हे सर्वांत वयोवृद्ध आमदार असून त्यांचे वय ८० वर्षे आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.