दहावीच्या परीक्षेत मोठा बदल; आता 35 ला नाही तर 20 ला पास; गणित, विज्ञानात 20 गुण मिळाले तरी मिळणार अकरावीत प्रवेश
जयदीप मेढे October 22, 2024 12:13 PM

मुंबई :   शाळेत लहानपणापासून गणित या विषयाचं नाव घेतलं तरी भल्याभल्यांच्या पोटात गोळा येतो.  एकतर हा विषय कधीच आपलासा वाचक नाही   आणि त्या विषयाचा पेपर म्हटलं की जीव आणखीनच नको नकोसा होऊन जातो. अनेक विद्यार्थ्यांच्या मनात गणिताचा फोबिया असतो.  गणिताची भीती जोवर मनातून जात नाही, तोवर तो विषय त्यांच्या आवडीचा होणार नाही. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना दहावीच्या बोर्डाच्या (SSC Exam)  परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये 35 पेक्षा कमी आणि 20 पेक्षा जास्त गुण मिळाले, तरी अकरावीमध्ये प्रवेश घेता घेणार आहे. नव्या अभ्यासक्रम आराखड्यात यासंदर्भात तरतूद करण्यात आलीय. 

 बोर्डाच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये 35 पेक्षा कमी आणि 20 पेक्षा जास्त गुण मिळाले, तरी असा विद्यार्थी पुढील शिक्षण घेऊ शकणार आहे. मात्र त्यांच्या  रिझल्टवर एक विशिष्ट शेरा देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता दोन पर्याय  समोर येणार आहे. एक  म्हणजे  प्रमाणपत्र घेऊन  अकरावीसाठी प्रवेश घेणे किंवा पुन्हा परीक्षा देणे. मात्र हा पर्याय त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना पुढे गणित किंवा विज्ञान या दोन्ही विषयांवर आधारीत कोणतेही करिअर करायचे नाही. त्या विद्यार्थ्यांना हा नियम लागू होणार आहे.  त्यामुळे ज्यांना विज्ञान किंवा गणित हे विषय घेऊन उच्च शिक्षण घ्यायचे नाही त्यांना याचा फायदा होणार आहे..  यामुळे विद्यार्थ्यांसाठी गणित किंवा विज्ञान विषयाची भिती कायमची वजा होणार आहे.

जन्म दाखल्याबरोबच पदवीचे प्रमाणपत्र द्या: हेरंब कुलकर्णी

शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय घातक निर्णय आहे. आपल्याला पदवीधरांची संख्या वाढवायची आहे का? की गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचे हे एकदा शासनाने ठरवले पाहिजे. जागतिक प्रतवारीचे जे अभ्यास होतात त्यामध्ये शिक्षणाचा दर्जा ठरवला जातो.  2020 साली भारत हा 33 व्या क्रमांकावर होता. येथून पुढच्या काळात तंत्रज्ञानाच्या आधारे नोकऱ्या मिळणार आहे.त्यासाठी गणित आणि विज्ञान अतिशय महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना फक्त पास करण्यापेक्षा जास्त ज्ञान आणि कौशल्य मिळतील असा प्रयत्न करणे गरजेचे आहे. सरकारला फक्त परीक्षा सोप्या करुन निकाल वाढवायचे असतीस तर माझी सूचना आहे की जन्म दाखल्याबरोबच पदवीचे प्रमाणपत्र द्यावे. त्याचे कारण  असे की आपल्याकडे जे वेगवेगळे सर्व्हे  येतात त्यामध्ये पदवी घेऊनही साधा अर्ज लिहता येत नाही, इतकी वाईट परिस्थिती आहे. गणितात पास करण्यापेक्षा गणिताची गोडी कशी लागेल, सोप्या पद्धतीने कसे शिकवता येईल? याचा विचार केला पाहिजे. 

पदवीधरांची संख्या वाढवून हा प्रश्न सुटणार नाही :  हेरंब कुलकर्णी

 "जे. कृष्णमूर्ती म्हणतात, गणित आणि विज्ञान हे विषय नाहीत. विज्ञान हा विषय विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन विकसीत करतो तर गणित हा विषय विद्यार्थ्यांची तर्कशक्ती विकसीत करतो. म्हणून हे विषय विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्त्वाशी निगडीत आहेत. त्यामुळे  मार्कांशी खेळ करण्यापेक्षा त्या विद्यार्थ्यांना समग्र ज्ञान कसे मिळेल?   संकल्पना  कशा समजतील? त्या विषयात तज्ञ कसे  होतील? हा दृष्टीकोन सरकारचा पाहिजे. फक्त पदवीधरांची संख्या वाढवून हा प्रश्न सुटणार नाही," असेही हेरंब कुलकर्णी म्हणाले. 

हे ही वाचा :

 दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या पद्धतीत बदल होणार? नवीन राज्य अभ्यासक्रम आराखडा लागू झाल्यानंतर अंमलबजावणी होणार 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.