सायन-कोळीवाड्यात तमिळ सेल्वन यांची हॅटट्रीक होणार का?
GH News October 22, 2024 06:14 PM

सायन- कोळीवाडा विधानसभा मतदार संघ क्र.179 ( Sion-Koliwada Assembly Constituency No. 179 ) हा मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघाचा एक भाग आहे. हा दक्षिण मध्य मुंबईतील मतदार संघ मुंबई शहर जिल्ह्यात मोडतो. साल 2019 च्या विधानसभा निवडणूकीत येथे भाजपाचे कॅप्टन आर. तमिळ सेल्वन निवडून आले होते. साल 2014 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणूकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत तमिळ सेल्वन पहिल्यांदा निवडून आले होते. त्यावेळी साल 2014 मध्ये भाजपाचे ते एकमेव निवडून आलेले तामिळ उमेदवार होते. यंदाही भाजपाच्या पहिल्या यादीत तमिल सेल्वन यांनाच तिकीट मिळाले आहे. त्यामुळे यंदा त्यांची हॅटट्रीक होते का ? याकडे लक्ष लागले आहे.

भाजपाने जाहीर केलेल्या विधानसभेच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत सायन-कोळीवाडा मतदार संघासाठी विद्यमान आमदार तमिळ सेल्वन यांनाच पुन्हा तिकीट दिले आहे.महाविकास आघाडीत हा मतदार संघ शिवसेना उद्धव ठाकरे गटाला जाण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे गटाने अद्याप येथे कोणालाही उमेदवारी जाहीर केलेली नाही. कॉंग्रेसचे गणेश कुमार यादव देखील येथे आपला प्रचार करीत आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मंगेश सातमकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून मंगेश सातमकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र ठाकरे गटाकडून कोणाला तिकीट मिळते यावर सर्व गणित ठरणार असल्याचे म्हटले जात आहे.

विधानसभा निवडणूक 2019 निकाल

दोन निवडणूकात भाजपाचा विजय

साल 2019 च्या विधानसभा निवडणूकांत भाजपाचे कॅप्टन आर.तमिळ सेल्वन 54,845 मते मिळवून विजयी झाले होते. कॉंग्रेसचे पक्षाचे गणेश कुमार यादव यांना दुसऱ्या क्रमांकाची ( 40,894 ) मते मिळाली होती. विजयाचे अंतर 13,951 मतांचे होते. साल 2014 च्या विधानसभा निवडणूकीत भाजपाचे कॅप्टन तमिळ सेल्वन यांना 40,869 मते मिळून विजयी झाले. शिवसेनेचे मंगेश सातमकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते (37,131 ) मिळाली होती. विजयाचे अंतर 3,738 मते इतके होते.

विधानसभा निवडणूक 2014 निकाल

लोकसभेचा निकाल काय होता ?

साल 2024 च्या लोकसभा निवडणूकीत मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनिल देसाई यांचा विजय झाला होता. त्यांनी एकनाथ शिंदे गटाचे नेते राहुल शेवाले यांचा पराभव केला होता. शिवसेना उद्धव (UBT)गटाचे उमेदवार अनिल देसाई यांनी 53, 384 मते मिळवित विजय मिळवला होता. तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांना 3,41,754 मते मिळाली होती.

समस्याचे आगार

सायन कोळीवाडा मतदार संघ हा संमिश्र वस्तीचा परिसर आहे. येथे उत्तर भारतीय, पंजाबी, तामिळी, तुळू, मुस्लीमांची मोठी लोकसंख्या आहे. मोठ्या प्रमाणावर असलेली झोपडपट्टी आणि अस्वच्छता,डांसांचा प्रादुर्भाव, तुंबलेली सतत वाहती गटारे, म्हाडाच्या जुनी संक्रमण शिबिरातील अपुरा पाणी पुरवठा आणि सार्वजनिक वाहतूकीच्या समस्या येथे पाचवीला पुजलेल्या आहेत.

एकूण मतदार 2,81,299

मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघाच्या सहा मतदार संघापैकी सायन-कोळीवाडा मतदार संघ ( क्र.179 ) हा एक मतदार संघ असून या मतदार संघात एकूण 2,81,299 मतदार आहेत. हा सर्वसाधारण वर्गवारीचा मतदार संघ असून संमिश्र वस्ती असलेल्या हा मतदार संघ आहे. 2011 च्या जनगणनेनुसार या मतदार संघात एससी वर्गवारीचे सुमारे 14,858 मतदार असून ते 5.81 टक्के आहेत. तर एसटी वर्गवारीचे सुमारे 2,481 मतदार असून त्यांची टक्केवारी 0.97 टक्के आहे. तर मुस्लीम मतदारांची संख्या 53,958 इतकी आहे. एकूण मतदारांच्या तुलनेत मुस्लीम मतदारांची संख्या 21.1 टक्के आहे.साल 2019 च्या लोकसभा निवडणूकीत येथे 53.78 टक्के मतदान झाले होते. तर 2019 च्या विधानसभा निवडणूकीत येथे 50.78 टक्के मतदान झाले होते.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.