संजू सॅमसनचा गौतम गंभीरबाबत मोठा खुलासा, दोन सामन्यानंतर मी तर…
GH News October 22, 2024 07:13 PM

विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन हा क्रीडाप्रेमी आणि सिलेक्टर यांच्या मध्यात फसलेला क्रिकेटपटू अशी चर्चा होत असते. संजू सॅमसनला सिलेक्शन झालं तरी चर्चा नाही झाली तरी चर्चा.. संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं तरी चर्चा नाही तरी चर्चा..संधी मिळाली तर त्याचं सोनं करता येत नव्हतं. त्यामुळे संघात आत बाहेर अशी स्थिती होती. पण टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर संजू सॅमसनला वारंवार संधी दिली जात आहे. झिम्बाब्वे दौऱ्यानंतर श्रीलंका दौऱ्यात संधी मिळाली. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्येही खेळण्याची संधी मिळाली होती. नुकत्याच पार पडलेल्या बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेतही खेळला. पण पहिल्या दोन सामन्यात सपशेल फेल गेला. मात्र तिसऱ्या सामन्यात कमबॅक करत वादळी शतक ठोकलं. यानंतर संजू सॅमसनने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्याने काही धक्कादायक खुलासे केले आहे. टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये हेड कोच गौतम गंभीरला नजर देणं कठीण झालं होतं. पण शतकी खेळी केल्यानंतर सर्वात जास्त खूश गौतम गंभीर झाल्याचंही त्याने सांगितलं. संजू सॅमसन आणि गौतम गंभीर यांच्यात जुनं नातं आहे आणि दिल्लीच्या एका क्रिकेट अकादमीतून सुरु झालं होतं.

संजू सॅमसनने सांगितलं की, ‘एका लहान मुलगा म्हणून मी गौतम गंभीरवर प्रभाव टाकू इच्छित होतो. तो एलबी शास्त्री क्रिकेट अकादमीत यायचा. आता मी जेव्हा पहिलं टी20 आंतरराष्ट्रीय शतक ठोकलं तर गंभीर माझ्यासाठी खूप खूश होता.’ संजू सॅमसनने पुढे सांगितलं की, ‘एक खेळाडू आणि कोच यांच्यातील नातं खूप महत्त्वाचं असतं. कोचवर तुम्ही विश्वास ठेवता आणि तो तुमच्यासोबत उभा राहतो. त्यामुळे चांगली कामगिरी करून हा विश्वास खरा करून दाखवणं महत्त्वाचं असतं. पहिल्या दोन सामन्यात काही खास करू शकलो नाही. त्यामुळे मला गंभीरच्या नजरेत नजर मिळवणं कठीण झालं होतं. पण मी स्वत:ला सांगितलं की माझी वेळ येईल. मग मी सेंच्युरी केली तर गंभीरने माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या. मी खूप खूश होतो.’

संजू सॅमसनने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात फक्त 47 चेंडूत 111 धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने 8 षटकार आणि 11 चौकार मारले होते. आता संजू सॅमसन दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत दिसणार आहे. ही मालिका पुढच्या महिन्यात होणार आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया नोव्हेंबर महिन्यात चार सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.