देशांतर्गत क्रिकेटची स्थिती पाहून सुनिल गावस्कर यांनी आयपीएलवर काढला राग, म्हणाले…
GH News October 22, 2024 09:13 PM

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. दुसरीकडे, देशात प्रतिष्ठित अशी रणजी ट्रॉफी स्पर्धा सुरु आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेला 11 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. रणजी स्पर्धेत नावलौकीक मिळवून अनेक खेळाडूंनी टीम इंडियात स्थान मिळवलं आहे. मात्र या स्पर्धेची दुर्दशा झाल्याचं मत माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांनी व्यक्त केलं आहे. काही दिग्गज खेळाडू रणजी ट्रॉफी ऐवजी ओमानमध्ये खेळल्या जाणाऱ्या इमर्जिंग आशिया कप स्पर्धेत भाग घेतला आहे. यामुळे माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुनिल गावस्कर यांच्या म्हणण्यांनुसार, भारतीय खेळाडू देशांतर्गत क्रिकेटऐवजी अन्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी धावत आहेत. त्यामुळे रणजी स्पर्धेचं महत्त्व कमी होत आहे.

तिलक वर्मासारखे दिग्गज खेळाडू रणजी स्पर्धेऐवजी इमर्जिग आशिया कप स्पर्धेत इंडिया ए संघाकडून खेळत आहे. ‘भारत न्यूझीलंड कसोटी मालिका सुरु आहे. काही खेळाडूंनी इमर्जिंग आशिया कप स्पर्धेत भाग घेतला आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धा सुरु झाली आहे. जर खेळाडूंना अशा पद्धतीने वेगळ्या स्पर्धेत खेळण्यासाठी नेलं जात असेल तर देशांतर्गत क्रिकेटचं महत्त्व कमी होत आहे.’, असं मत सुनिल गावस्कर यांनी व्यक्त केलं.

इतकंच काय तर गावस्कर यांनी स्पोर्टस्टारवरील एका लेखात लिहिलं की, पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी दक्षिण अफ्रिकेत चार सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. इंडिया ए टीम ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. त्यामुळे जवळपास 50 ते 60 खेळाडू रणजी ट्रॉफी स्पर्धेत राज्याच्या संघासाठी उपलब्ध नसतील.

‘जेव्हापासून आयपीएल सुरु झालं आहे तेव्हापासून रणजी स्पर्धेचं महत्त्व कमी झालं आहे. इतर देश भारतासारखं आपल्या देशांतर्गत स्पर्धेकडे अशा पद्धतीने पाहात नाही. तुम्ही कधी इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया या देशांना त्यांच्या देशांतर्गत स्पर्धेदरम्यान ए टूर किंवा इतर स्पर्धांमध्ये भाग घेताना पाहिलं आहे का? आयपीएल सुरु झाल्यापासून रणजी खूप मागे गेली आहे.’, असंही सुनिल गावस्कर यांनी सांगितलं आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.