भाषेच्या शिक्षणाची सद्य:स्थिती
esakal November 06, 2024 10:45 AM

- प्रा. संगीता घोडके

भाषेच्या उत्क्रांतीचा इतिहास पाहिला, तर पंधरा हजार वर्षांपूर्वीपासून आढावा घ्यावा लागेल. भाषा ही अनेक बदलांना सामोरी जात आता एका नवीन वळणावर येऊन पोहोचली आहे. भाषेसारख्या विषयांमध्ये शिक्षण घेताना शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. मातृभाषेतून की परकीय भाषेतून शिक्षण हा मुद्दा आता बाजूला पडून तंत्रज्ञानाच्या युगामध्ये भाषेच्या शिक्षणामध्ये असणाऱ्या संधी आणि आव्हाने यांचा विचार करण्याची ही वेळ आहे.

संधी

प्रथमतः आपण कोणत्याही भाषेच्या सखोल ज्ञानामुळे उपलब्ध होणाऱ्या संधीचा विचार करूया. भाषा शिकणे म्हणजे त्या भाषेतील लोकांची संस्कृती समजून घेणे. उदाहरणार्थ, मराठी भाषा मराठी लोकांचे जीवनमान आणि संस्कृती यांचे दर्शन घडविते. परकीय भाषा शिकतानासुद्धा आपण त्या भाषेतील लोकांचे जीवनमान समजून घेतो. दोन किंवा दोनपेक्षा जास्त भाषा येणाऱ्या लोकांना नोकरीच्या संधी त्या त्या प्रांतामध्ये उपलब्ध होतात.

पुण्यामध्ये अनेक जर्मन ऑटोमोबाईल कंपन्या जर्मन भाषा येणाऱ्या स्थानिक मुलांना नोकरीसाठी प्राधान्य देतात. इतरही अनेक संधी उपलब्ध होतात. जसे की, आपण भाषांतरकार आणि कंटेंट डेव्हलपर म्हणूनही काम शोधू शकतो. भाषा येण्यासाठी खूप चांगला शब्दसंग्रह अपेक्षित असतो. साहाजिकच भाषा शिकण्यातून बुद्धिमत्तेची धार वाढते.

भाषेच्या आदान-प्रदानामुळे आपण मैत्रीचे दालन एकमेकांसाठी खुले करतो. भारतात आलेले अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा जेव्हा आपल्याला ‘नमस्कार’ म्हणतात, तेव्हा आपल्याला आनंद होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नेहमी इतर देशांच्या भाषणांमध्ये जाणीवपूर्वक यांच्या भाषेमधून थोडासा तरी संवाद साधून स्थानिकांची मने जिंकून घेतात.

जगाच्या पटलावर

प्रवासादरम्यान आपण अनेकविध प्रांतातील लोकांच्या संपर्कात येतो. मराठी माणूस केरळला जातो आणि मल्याळममध्ये तेथील स्थानिक माणसाशी संवाद साधतो, तेव्हा त्याला थोडं जास्त प्रेम तिथल्या लोकांकडून मिळते. परकीय भाषा आपल्याला येत असेल, तर स्थानिक लोकांना आपल्याला व्यवहारांमध्ये फसवणे अवघड जाते. भाषामुळे आपण ज्ञानसंपन्न होऊ शकतो.

त्या भाषेतील साहित्य, कलाकृती, चित्रपट, संगीत आणि शॉपिंग या सगळ्या गोष्टींचा आनंद लुटू शकतो. आज-काल आपण कॉन्टिनेन्टल क्यूजिनचा आनंद घेतो, कारण सगळ्या देशांच्या रेसिपीज आपण भाषा येत असल्यामुळे वाचतो आणि त्या करतोही. पिझ्झा, बर्गर, चायनीज हे जणू काही भारतीय खाद्यपदार्थ असल्यासारखे आपण चाखू लागले आहोत. भाषा नसती तर, सॉफ्टवेअर आणि ॲप्स जन्माला आले असते का? याचा विचार करायला हवा.

आव्हाने

आता तंत्रज्ञानाच्या युगात भाषेसमोर असलेली आव्हाने जाणून घेऊया. भाषा शिकण्यासाठी आपल्याला प्रामाणिक प्रयत्न करावे लागतात. यासाठी वेळ आणि मेहनत दोन्हीही मनापासून करावी लागते. दररोज हजारो शब्द बोली भाषेमध्ये समाविष्ट होत असतात. सगळे शब्द वापरता येणे अपेक्षित नसले तरीही किमान प्रमाणभाषा बोलता यावी असे प्रत्येकाला वाटते.

आज-काल आपल्या सेवेमध्ये ‘अलेक्सा’ आणि ‘गुगलगुरू’ दाखल झाले आहेत. रोबोटच्या या दुनियेमध्ये माणसाच्या बुद्धिमत्तेला आणि कर्तुत्वाला संधी आहे का? पण, रोबोट या मशीनच्या मागे काम करणारा मानवी मेंदूच आहे ना! आपली उपयोगिता कशी संपेल?

तरीही आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे सगळी समीकरणे आता बदलू लागली आहेत. अगणित आणि अमर्याद असे साहित्य आपल्याला ऑनलाइन उपलब्ध होते आहे. शिक्षकांकडून मिळणारे ज्ञान विद्यार्थ्यांना अपुरे वाटू शकते. कारण, यूट्यूब, गूगल क्रोम, सोशल मीडिया या माध्यमातून विद्यार्थी शिकत आहेत. या सगळ्या माध्यमांचा वापर करून ज्ञान मिळवण्यात काहीच गैर नाही, पण अनावश्यक आणि समाजविघातक असेही ज्ञान विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होते आहे.

परिणामतः अमेरिकन शाळांमधील मुलांनी गोळीबार केल्याच्या घटना घडल्या आहेत. भारतामध्ये विद्यार्थिनी, महिलांवर ‘पॉर्न व्हिडिओ’मुळे बलात्कार होतो आहे. कुठे थांबायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. ए.आय.द्वारे संशोधन करणे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीवर हक्क सांगणे यांसारख्या गोष्टींमध्येही अनेक समस्या निर्माण होत आहेत.

इंटरनेटवरील साहित्य चोरून चांगल्या दर्जाचे संशोधन आणि संशोधक तयार होत नाहीत, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. संगणकयुगात आपले पाठांतर, वाचन आणि लेखन फार कमी झाले आहे. परंतु, हा जरी ‘इन्स्टंट’चा जमाना असला, तरी वेळ घेऊन, व्यवस्थितपणे केलेल्या कामाचा आनंद हा अवर्णनीय असतो हे निर्विवाद सत्य आहे. भाषेच्या बाबतीत आपण हाच मंत्र ध्यानात ठेवायला हवा!

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.