मी अजून किती दाढी पिकवायची? माझ्या मागून आलेले अनेक जण मंत्री झाले. ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट, अमित देशमुख, विश्वजीत कदम हे सर्व माझ्यानंतर आमदार-खासदार होऊन मंत्री झाले. असं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे कुडाळचे उमेदवार निलेश राणे यांनी मंत्री होण्याची इच्छा मालवण येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलून दाखवली. पुढे ते असेही म्हणाले, मला मंत्री व्हायंच नाही. एवढी मोठी माझी स्वप्न नाहीत तर मला फक्त कुडाळ मालवण मधील लोकांची सेवा करण्याची संधी मिळावी, अशी इच्छा मतदारांपुढे निलेश राणेंनी बोलून दाखवली. जिथे नारायण राणेंचा पराभव झाला तिथेच मला निवडून यायचं आहे, म्हणून कुडाळ मालवण विधानसभा निवडणूक लढतोय असंही निलेश राणे म्हणाले. गेल्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे निवडून यावेत असं नियतीला मान्य होतं म्हणून ते लोकसभा निवडणुकीत निवडून आले आणि आता विधानसभा निवडणुकीला निलेश राणे निवडून आला पाहिजे असंही नियतीला मान्य असल्याचं दिसतंय असं निलेश राणे म्हणाले. मालवणमधील सभेत बोलताना निलेश राणे यांनी हे वक्तव्य करून भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन कुडाळ मालवण विधानसभेतील मतदारांना केलं.