MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?
esakal November 06, 2024 09:45 PM

मनसे पुन्हा एकदा विधानसभेच्या मैदानात उतरली. राज ठाकरे यांचा सभांचा धुराळा सुरु आहे. मनसेने जवळपास १५७ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले. माहाराष्ट्र नवनिर्मान सेनेला पुन्हा २००९ सारखं यश मिळणार का?, असा प्रश्न राजकीय वर्तुळाच चांगलाच चर्चेत आला. शिवसेनेपासून वेगळे झाल्यानंतर राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली. त्यानंतर राज ठाकरे यांनी २००९ ची विधानसभा निवडणूक देखील लढवली अन् आपले १३ आमदार निवडून आणले.

२००९ मधील मनसेचे प्रमुख आमदार कोण होते?

२००९ मध्ये नाशिकसारख्या भागांतून मनसेने मोठा विजय मिळवला होता. त्या काळात हर्षवर्धन जाधव, शिशिर शिंदे, राम कदम,, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि रमेश वांजळे यांसारखे मनसेचे प्रमुख नेते निवडून आले होते. परंतु, त्यांपैकी अनेकांनी नंतर पक्ष बदलला तर काहींचे निधन झाले.

सध्याच्या स्थितीत मनसेचे १३ आमदार कुठे आहेत?

१. हर्षवर्धन जाधव - कन्नड

२००९ मध्ये कन्नड मतदारसंघातून निवडून आलेले जाधव नंतर शिवसेनेत सामील झाले आणि २०१४ मध्ये त्यांनी शिवसेनेतून निवडणूक जिंकली. सध्या ते अपक्ष आहेत.

२. उत्तमराव ढिकळे - नाशिक पूर्व

नाशिक पूर्व मतदारसंघातून निवडून आलेले ढिकळे यांनी १८ हजार मतांनी विजय मिळवला होता. त्यांचे निधन २०१५ मध्ये झाले. आज त्यांच्या मुलाने भाजपच्या तिकिटावर आमदारकी मिळवली आहे.

३. वसंत गिते - नाशिक

गिते यांनी काँग्रेसला मोठा धक्का देत विजय मिळवला होता. परंतु, नंतर ते शिवसेनेत परत गेले.

४. नितीन भोसले - नाशिक पश्चिम

नितीन भोसले यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक जिंकली, परंतु २०१४ आणि २०१९ मध्ये अपयशी ठरले. २०२३ मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला.


५. रमेश रतन पाटील - कल्याण ग्रामीण

रमेश रतन पाटील यांनी काँग्रेसमध्ये सुरुवात केली, परंतु मनसेतून निवडून आले. पुढे भाजप आणि पुन्हा काँग्रेसमध्ये परतले.

६. प्रकाश भोईर - कल्याण पश्चिम

प्रकाश भोईर २००९ मध्ये निवडून आलेले भोईर आजही मनसेतच कार्यरत आहेत.

७. मंगेश सांगळे - विक्रोळी

सांगळे यांनी विक्रोळीतून निवडणूक जिंकली, पण २०१४ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. नंतर ते भाजपमध्ये गेले.

८. शिशिर शिंदे - भांडुप पश्चिम

एकेकाळचे बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू शिंदे, नंतर राज ठाकरेंसोबत राहिले. आता ते शिवसेना ठाकरे गटात उपनेते आहेत.

९. राम कदम - घाटकोपर पश्चिम

त्यांनी मनसे सोडून भाजपात प्रवेश केला आणि तेथेच आपली राजकीय कारकीर्द पुढे नेली.

१०. प्रवीण दरेकर - मागाठणे

दरेकर यांनी भाजपा प्रवेश केला आणि त्यांनी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले.

११. बाळा नांदगावकर - शिवडी

आजही राज ठाकरेंसोबत राजकारणात कार्यरत असलेले नांदगावकर १९९५ पासूनच राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक आहेत.

१२. नितीन सरदेसाई - माहीम

सरदेसाई हे देखील मनसे सोडून गेले नाहीत. ते आजही राज ठाकरेंसोबत आहेत.

१३. रमेश वांजळे - खडकवासला

वांजळे यांनी २००९ मध्ये विजय मिळवला परंतु त्यांचे २०११ मध्ये निधन झाले.

मनसेला २०२४ मध्ये पुन्हा यश मिळणार का?

यांच्या नेतृत्वात मनसे २०२४च्या निवडणुकीत पुन्हा आपला प्रभाव सिद्ध करू पाहते. त्यांच्या सभांमुळे मतदारांमध्ये उत्सुकता आहे. मात्र, २००९चे यश पुनःप्राप्त करणे आव्हानात्मक आहे, कारण त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांनी अनेकांनी पक्ष बदलला आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.