भारतीय क्रिकेट संघाला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत 3-0 ने व्हाईटवॉश स्वीकारावा लागला. भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाची मायदेशात 3 किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या मालिकेत व्हाईट वॉशने पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. त्यानंतर आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या टेस्ट रँकिंगमध्ये टीम इंडियाचा विस्फोटक विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याने मोठी झेप घेतली आहे. शुबमन गिल यालाही फायदा झाला आहे. तर रोहित शर्मा आणि विराट कोहली या आजी माजी कर्णधारांना मोठा फटका बसला आहे.
ऋषभ पंतने या कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. पंतने इंडिया-न्यूझीलंड मालिकेत सर्वाधिक धावा केल्या होत्या.पंतला त्याचा फायदा रँकिंगमध्ये झाला आहे. पंतची टॉप 10 मध्ये एन्ट्री झाली असून त्याने पहिल्या पाचात येण्यासाठी दावा ठोकला आहे. तर शुबमन गिल यालाही फायदा झाला आहे. मात्र रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना जबरदस्त फटका बसला आहे. या दोघांना न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती.
पंतने थेट 5 स्थानांची झेप घेतली आहे. त्यामुळे पंत थेट सहाव्या स्थानी येऊन पोहचला आहे. पंतच्या खात्यात 750 रेटिंग पॉइंट्स आहेत. तर शुबमन गिलने टॉप 20 मध्ये झेप घेतली आहे. गिलने 4 स्थानांनी झेप घेत 16 व्या क्रमांकावर पोहचला आहे. गिलकडे 680 रँकिंग पॉइंट्स आहेत. तर विराट आणि रोहितला प्रचंड नुकसान झालंय. विराटला 8 स्थांनाचा फटका बसला आहे. त्यामुळे विराट थेट 22 व्या स्थानी फेकला गेला आहे. तर रोहित 24 वरुन 26 व्या क्रमांकावर पोहचला आहे.
दरम्यान या टेस्ट बॅटिंग रँकिंगमध्ये अव्वल स्थानी इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट कायम आहे. दुसऱ्या स्थानी न्यूझीलंडचा केन विलियमसन आहे. केनला टीम इंडियाविरुद्धच्या एकाही सामन्यात खेळता आलं नाही. मात्र त्यानंतरही केनने दुसरं स्थान कायम राखलं आहे. हॅरी ब्रूकने यशस्वी जयस्वालला मागे टाकत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. त्यामुळे यशस्वीची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ पाचव्या क्रमांकावर आहे. पंत सहाव्या क्रमांकावर आहे. डॅरेल मिचेलने 8 स्थानांची झेप घेत सातव्या क्रमांकावर उडी घेतली आहे. उस्मान ख्वाजा आठव्या, सऊद शकील नवव्या तर मार्नस लबुशेन 10 व्या क्रमांकावर आहे.