उपनगरीय रुग्णालयांना दिलासा
कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याच्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : पालिकेने १२४० नॉन-शेड्यूल्ड पदे रद्द करण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित केला आहे, त्यामुळे पदे रद्द न करण्याच्या आणि काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करण्याच्या सूचना व्हॉट्सॲपवरून पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे उपनगरीय रुग्णालय प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
उपनगरीय रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. हा भार हाताळण्यासाठी कायमस्वरूपी आणि कायमस्वरूपी नसलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. ऑगस्ट महिन्यात, पालिकेने एक पत्र जारी करून कायमस्वरूपी नसलेल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यास सांगितले. ज्यात डॉक्टर, ओटी अटेंडंट, नोंदणी सहाय्यक, रक्त संक्रमण अधिकारी आणि इतर कर्मचारी यांचा समावेश आहे. या आदेशानंतर रुग्णालय प्रशासनाच्या अडचणी वाढल्या. पदे रद्द करणे, कमी मनुष्यबळ यामुळे रुग्णांच्या सुविधांवर मोठा परिणाम होणार होता. यासंदर्भात पालिका मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही समस्यांची माहिती दिली होती. तरीही आदेश मागे घेण्यात आला नाही. अखेरीस पालिका प्रशासनाने आपल्या उपनगरीय रुग्णालयाच्या प्रमुखांना एक प्रस्ताव पाठवण्यास सांगितले. सोमवारी (ता. ४) उपनगरीय रुग्णालयांच्या अधिकाऱ्यांना पालिका मुख्यालयातून एक संदेश आला, ज्यात काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर परत बोलावण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावरून पालिका पद रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याच्या विचारात असल्याचे स्पष्ट झाल्याचे उपनगरीय रुग्णालयाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर परत बोलावण्याच्या सूचना व्हॉट्सॲपवर देण्यात आल्या आहेत.