अभिरूची मैफलीत
गुरव यांचे गायन
साडवली : देवरूख येथे अभिरूचीतर्फे आयोजित दिवाळी मैफल प्रसिद्घ गायक विशारद गुरव यांनी रंगवली. गणेश वेदपाठशाळेच्या सभागृहात रंगलेल्या या मैफलीत विशारद गुरव यांनी मारू बिहाग राग व ख्याल बंदिशीने सुरवात केली. त्यानंतर एकापेक्षा एक गीते सादर करताना विशारद गुरव यांनी रवी मी, पंढरीचे सुख, बसंत की बहार आयी, निराकार ओंकार, आनंदसुधा, तीर्थ विठ्ठल, सूरगंगा मंगला अशी गीते सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. स्वामी कृपा कधी करणार, या भैरवीने मैफलीची सांगता झाली. मैफलीला अथर्व आठल्ये यांची तबलासाथ व चैतन्य पटवर्धन यांची हार्मोनियम साथ लाभली.
----
एनएसएस शिबिरास
‘सप्रे’मध्ये प्रारंभ
साडवली : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सातदिवसीय श्रमसंस्कार शिबिराचा प्रारंभ साखरपा, कोंडगाव येथील कबनूरकर हॉलमध्ये झाला. या वेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीधर कबनूरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, प्रा. सीमा शेट्ये, प्रा. सीमा कोरे आदी उपस्थित होते. शिबिरार्थींना कबनूरकर यांनी शुभेच्छा देऊन स्वयंशिस्त व सामाजिक अनुकूलनाचे महत्व विशद केले. प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी एनएसएस विभागाचे सामाजिक योगदान, विद्यार्थी स्वयंसेवकांना होणारे वैयक्तीक लाभ, उपक्रमातून विद्यार्थ्यांना विविध स्तरांवर सिद्ध करण्याची असणारी संधी याबाबत सविस्तर विवेचन केले.
------
वालावलकर केंद्रात
आज मोफत शिबिर
चिपळूण ः शहरातील स्वयंभू मळ्याच्या गणपती शेजारील वालावलकर शहरी आरोग्यकेंद्रात मोफत आरोग्य तपासणी शिबिर गुरूवारी (ता. ७) सकाळी ९ ते ३ या वेळेत होणार असून, रुग्णांच्या विविध तपासण्या केल्या जाणार आहेत. डॉ. अनघा संत (त्वचारोग तज्ज्ञ) केसात कोंडा होणे, त्वचेवरील चट्टे, डाग, सोरायसिस, केस गळणे व इतर सर्व आजारांबाबत तपासणी करणार असून रुग्णांना मार्गदर्शन करणार आहेत. रक्त तपासणी गरजेनुसार अल्पदरात केली जाणार आहे. सलाईन व किरकोळ औषधे मोफत दिली जाणार आहेत. जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.