अकोल्यात 'वंचित'ला मोठा धक्का! प्रकाश आंबेडकरांच्या विश्वासू नेत्याची सोडचिठ्ठी, आता उद्धव ठाकरेंचं शिवबंधन बांधणार
उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला November 07, 2024 11:13 AM

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे विदर्भातील ओबीसी नेते प्रा. डॉ. संतोष हुशे यांनी आज आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष व महासचिव यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा सादर केला आहे. एकीकडे विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना संतोष हुशे यांचा हा निर्णय म्हणजे वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.  

प्रकाश आंबेडकरांचे विश्वासू

प्रा. डॉ. संतोष हुशे हे गेल्या तीस वर्षांपासून ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात अहोरात्र काम करत होते. विशेषत: त्यांनी ओबीसी, बहुजन समाजामध्ये वंचित बहुजन आघाडी या पक्षाची पाळेमूळे रुजवलेली आहेत. अकोल्यात आंबेडकरांचे विचार घराघरात पोहोचविण्यात डॉ. हुशे यांचं योगदान मोठं आहे. प्रा.डॉ. संतोष हुशे यांच्या कार्यावर प्रेरित होऊन ओबीसी समाजातील अनेक युवकांनी पक्षाचे काम केले. आंबेडकरांनी गेल्या तीन टर्मपासून विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारीपासून 'वंचित' ठेवलं. दरवेळी शेवटच्या क्षणी त्यांना माघार घेण्यास सांगून ऐन वेळेवर इतर पक्षातील आयात उमेदवाराला उमेदवारी देऊन प्रा.डॉ. हुशे यांना संधी नाकारण्यात आली. 

गावागावात बूथ बांधणीपासून ते वरिष्ठ स्तरापर्यंत काम

प्रा.डॉ.हुशे यांनी गेल्या एक वर्षापासून बाळापूर व अकोला पूर्व या विधानसभा मतदारसंघाची वरिष्ठांच्या सूचनेनुसार तयारी केलेली होती. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी आंबेडकर यांच्या विजयाकरिता  जबाबदारी घेऊन गावागावात बूथ बांधणीपासून ते वरिष्ठ स्तरापर्यंत काम केलं होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे वंचित बहुजन आघाडीला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे.   

डॉ. संतोष हुशे करणार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश  

डॉ. संतोष हुशे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या बाळापूर मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार नितीन देशमुख यांच्या प्रचारार्थ उद्वव ठाकरे वाडेगाव येथे सभा घेणार आहेत. याच सभेत डॉ. हुशे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. हुशे यांच्या प्रवेशाने ठाकरे गट लढत असलेल्या बाळापूर आणि अकोला पूर्व मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं बळ मिळणार आहे. 

अकोला पूर्व मतदारसंघातून उमोदवारी नाकारल्याने डॉ. संतोष हुशे नाराज

डॉ. संतोष हुशे यांचं नाव बाळापूर, अकोट आणि अकोला पूर्व मतदारसंघात वंचितच्या इच्छुकांमध्ये समाविष्ट होतं. मात्र, बाळापुरात वंचितने काँग्रेसचे माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांना ऐनवेळी आयात करत उमेदवारी दिली. तर अकोटमध्ये वंचितने वडील आणि भाऊ काँग्रेसमध्ये असलेल्या दीपक बोडखे यांना उमेदवारी दिली. डॉ. हुशे यांचा अकोला पूर्व लढविण्यावर पक्षाकडे आग्रह होता. मात्र, पक्षाने तेथून जिल्हा परिषदेतील गटनेते ज्ञानेश्वर सुलताने यांना उमेदवारी दिली. यामूळे नाराज झालेल्या डॉ. हुशे यांनी अकोला पुर्वमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, छाननीत त्यांचा अर्ज बाद झाला. यानंतर आता त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात बुधवारी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांच्याशी सविस्तर चर्चा करीत प्रवेशचा निर्णय घेतला.

कोण आहेत प्रा. डॉ. संतोष हुशे? 

वंचित बहुजन आघाडीतील मोठा ओबीसी चेहरा. 

माळी समाजातील अतिशय आदर असलेले नेते. 

गेल्या 40 वर्षांपासून आंबेडकरांचे विश्वासू नेते म्हणून त्यांची अकोला जिल्ह्यात ओळख. 

अकोल्याच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि व्यापारी वर्तुळातील मोठं नाव. 

अकोला शहरातील ख्यातनाम 'हुशे बंधू ज्वेलर्स'चे संस्थापक

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.