कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
विजय केसरकर, एबीपी माझा November 07, 2024 06:43 PM

Prakash Abitkar on K P Patil : राधानगरी विधानसभा मतदारसंघात (Radhanagari Assembly Constituency) 10 वर्ष आमदार असताना ज्या के पी पाटील यांनी पाण्यासाठी काहीही काम केले नाही ते अदानींना पाणी विकणार म्हणून अत्यंत खोटा आरोप करत आहेत. पाण्याचा थेंब आणि थेंब वाचविण्याचे काम करणारा मी आमदार आहे. कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही, अशा शब्दात राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी के पी पाटील यांना उत्तर दिले आहे. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राधानगरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार के पी पाटील यांनी त्यांच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमात आमदार प्रकाश आबिटकर यांच्यावर वरील आरोप केला होता. उद्धव ठाकरे यांनीही आपल्या आदमापुरातील भाषणात के पी. पाटील यांनी उल्लेख केल्याचे सांगत तोफ डागली होती.  

हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प कधीच निकाली निघाला

प्रकाश आबिटकर म्हणाले की, भुदरगड तालुक्यातील पाटगाव मध्यम प्रकल्प येथे अदानी ग्रीन एनर्जी लिमीटेड कंपनी मार्फत उभारण्यात येणारा हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प हा कधीच निकाली निघालेला विषय आहे. राज्य शासनाने पॉवर लिफ्टींग करून वीज निर्मिती करता येते का? यासाठी प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबविली होती. या योजनेच्या प्रथम टप्प्यातले सर्वेक्षण सुरू झाल्यानंतर लोकांनी सांगितल्यावर या गोष्टीची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांना झाली. कोकणातील कुडाळ तालुक्यातून याची बातमी सर्वप्रथम प्रसिद्ध करण्यात आली. आमदार प्रकाश आबिटकर यांनी तत्काळ या विषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सोबत पत्रव्यवहार करून या योजनेला स्थगिती आणली आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

आम्हाला चिंधीचोरपणा करण्याची गरज नाही

प्रकाश आबिटकर म्हणाले, आम्हाला चिंधीचोरपणा करण्याची गरज नाही. या जनतेने दोन वेळा आमदार करून जे प्रेम दिले, त्या प्रेमाचा उतराई म्हणून या मतदारसंघात अनेक प्रकल्पांची उभारणी करण्यात येत आहे. अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यात येत आहेत. आपल्या कार्यकाळात नागणवाडी, सर्फनाला, निष्णप, मेघोली, झापाचीवाडी, वासनोली या प्रकल्पांचे पूजन करून पाणी आणण्यात आले आहे. धामणीचे पाणीपूजन लवकरच होईल. या मतदारसंघातील बसूदेव भुजाईच्या निमित्ताने 4 हजार हेक्टर जमीन पाण्याखाली आपण आणणार आहोत. मतदारसंघातील प्रत्येक डोंगर हा हिरवागार करण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

इतर महत्वाच्या बातम्या 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.