विधानसभेची खडाजंगी : नांदगाव मतदारसंघात तिरंगी लढत, सुहास कांदेंसमोर समीर भुजबळ, गणेश धात्रक यांचे आव्हान, कोण उधळणार गुलाल?
अनिरुद्ध जोशी November 07, 2024 06:43 PM

नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजताच नांदगाव विधानसभा मतदारसंघाची (Nandgaon Assembly Constituency) जोरदार चर्चा राज्यभरात रंगली. कारण या मतदारसंघातून महायुतीतून शिवसेना शिंदे गटाने विद्यमान आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांना पुन्हा एकदा संधी दिली. मात्र महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेते आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे पुतणे समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा देत समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने गणेश धात्रक (Ganesh Dhatrak) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. आता नांदगाव विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

नांदगाव विधानसभा मतदारसंघ हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भुजबळ यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव याच मतदारसंघातून केला. त्यावेळी पंकज भुजबळ यांना 96 हजार 292 मतं मिळाली तर संजय पवार (Sanjay Pawar) यांना 74 हजार 923 मतं मिळाली होती. 2014 मध्ये पंकज भुजबळ विरुद्ध सुहास कांदे अशी झाली. सुहास कांदेंना 50 हजार 827 मतं मिळाली. तर पंकज भुजबळ यांना 69 हजार 263 मतं मिळाली. या निवडणुकीत सुहास कांदेंचा पराभव झाला. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सुहास कांदेंना 85 हजार 275 मतं मिळाली. तर पंकज भुजबळ यांना 71 हजार 386 मतं मिळाली. 2019 च्या निवडणुकीत सुहास कांदेंनी पंकज भुजबळ यांचा पराभव केला होता. 

नांदगावमध्ये तिरंगी लढत

पंकज भुजबळ (Pankaj Bhujbal) यांना विधान परिषदेवर आमदारकी मिळाल्याने महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांचा मार्ग मोकळा झाला असे दिसत होते. मात्र समीर भुजबळ यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे सुहास कांदे यांच्या अडचणी वाढल्याचे दिसून येत आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने गणेश धात्रक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे नांदगाव विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : कळवण-सुरगाणा मतदारसंघात नितीन पवार की जे पी गावित?

Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : मालेगाव बाह्य मतदारसंघात भुसे की हिरे? कोण मारणार बाजी?

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.