Nagpur Assembly Election 2024: निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर कुंभारपुऱ्यात झाली सभा, कुंभार समाज निर्णायक भूमिका घेणार :सुरेश पाठक
esakal November 07, 2024 08:45 PM

नागपूर : मातीच्या कलाकृतीवर उदरनिर्वाह करणारा कुंभार समाज नेहमीच शासन-प्रशासन व राजकीय पक्षांकडुन उपेक्षित राहिला आहे. समाजाने आश्वासनांच्या भुलथापाना बळी पडून नेहमीच म्हणेल त्या पक्षावर विश्वास ठेवला. परंतु, सर्वच पक्षांनी समाजाला आश्वासनांचे गाजर दाखवीत त्यांचा मतांचा वापर केला. मात्र, यंदाच्या निवडणुकीत समाज निर्णायक भूमिका घेणार असल्याचे पारंपरिक मूर्तिकार व हस्तकला कारागीर संघांचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाठक म्हणाले.

नागपूर जिल्हा कुंभार समाज समन्वय समिती व पारंपरिक मूर्तिकार संघांच्यावतीने आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या सामाजिक शक्तीचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी कुंभारपुरा येथे कोअर कमेटीची सभा आयोजित करण्यात आली. त्यावेळी पाठक बोलत होते. ज्येष्ठ समाजसेवक फकीरचंद चौधरी यांचे अध्यक्षतेखाली, नागपूर जिल्हा कुंभार समाज समन्वय समितीचे संयोजक चंदनलाल प्रजापती यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा पार पडली.

पाठक म्हणाले, विधानसभा निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांनी समाजाचे प्रश्न व समस्यांचे समाधान करण्याचे लेखी वचन द्यावे. अन्यथा समाज संघटनात्मक रूपाने आपली स्वतंत्र भूमिका निर्धारित करून आपल्या अमूल्य निर्णायक मतांचा उपयोग करेल, असा सर्वांनुमते ठराव सभेमध्ये पारित करण्यात आला.

यानिमित्त समाजाच्या वस्तिमध्ये कार्यकर्त्यांचा घर, कुटुंब व व्यक्ती संपर्क अभियानाला शुभारंभ करण्यात आला आहे. बैठकीला मनोज वरवाडे, प्रवीण गाते, चंद्रकांत कपाटे, बंटी प्रजापती, आकाश कपाटे, नरेश खंदारे, निशांत पाठक, अरुण कपाटे, जानबा कपाटे, रोशन वालदे, नितीन माहुलकर, प्रभाकर वझे, संजय खंदारे, संजय गाते, देवा मराठे, सदानंद कपाटे, रामेश्वर चौधरी, बबलू कपाट आदी समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

समाजाच्या मागण्या काय?

  • श्री संत गोरोबा काका मातीकला बोर्ड

  • कार्यान्वित करा

  • प्लॅस्टर ऑफ पॅरिस मूर्ती बंदी कायदा करा

  • कुंभारखाणी परत द्या

  • माती रॉयल्टी ७०० ब्रास लागू करा

  • टीपीची अट रद्द करा

  • विधानपरिषदेत प्रतिनिधित्व द्या

समाजाचे बळ आकड्यात

  • राज्यात कुंभार समाजाची लोकसंख्या ६० लाखांच्या घरात

  • १७५ ते १८५ मतदारसंघात निर्णायक मते

  • नागपूर शहरातील सर्व विधानसभा क्षेत्रात कुंभार समाजाचे मतदार

  • मध्य व पूर्व मतदारसंघांमध्ये निर्णायक मतदार

मी मतदार बोलतोय... पाठवा आपला अजेंडा

विधानसभा निवडणुकीत मतदारराजाला आपल्या पसंतीचा आमदार निवडण्याची संधी चालून आली आहे. यासाठी तुमच्या मनातील आमदार कसा असावा, त्याने तुमच्या भागासाठी, समाजासाठी काय करावे, त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत. हे आम्हाला कळवता येणार आहे. यासाठी तुमचा मतदारसंघ, आमदारकडून अपेक्षा, प्रतिक्रिया आम्हाला ९०२२२६६५६९ या क्रमांकावर पाठवा. निवडक प्रतिक्रिया प्रकाशित करू.

#ElectionWithSakal

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.