Women’s Premier League 2025 चा रणसंग्राम 23 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. यासाठी मिनी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. तत्पूर्वी मुंबई इंडियन्स आणि रॉलय चॅलेंजर्स बंगळुरू या संघांनी अनुक्रमे 4 आणि 7 खेळाडूंना नारळ देत बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
डब्ल्यूपीएलचा पहिला हंगाम मुंबई इंडियन्सने गाजवला आणि विजेतेपदावर मोहर उमटवली. तर दुसऱ्या हंगामावर RCB ने वर्चस्व गाजवत विजेतेपद पटकावले. आता दोन्ही संघांनी डब्ल्युपीएलच्या तिसऱ्या हंगामासाठी संघ बांधणीला सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने डब्ल्यूपीएलच्या मिनी लिलाव प्रक्रियेपूर्वी दोन्ही संघांनी काही खेळाडूंना करारमुक्त केले आहे, तर काही खेळाडूंना कायम ठेवले आहे. मुंबई इंडियन्सने चार खेळाडूंना करारमुक्त केले आहे. या खेळाडूंमध्ये प्रियांका बाला, हुमैरा काझी, फातिमा जाफर आणि इस्सी वोंग या खेळाडूंचा समावेश आहे. गतविजेत्या आरसीबीने एकून 7 खेळाडूंना करारमुक्त केले आहे. या खेळाडूंमध्ये दिशा कसाट, नदीन डी क्लार्क, शुभा सतीश, श्रद्धा पोक्कर, हेदर नाईट, इंद्राणी रॉय आणि सिमरन बहादूर या खेळाडूंचा समावेश आहे.
सात खेळाडूंना करारमुक्त केल्यामुळे लिलाव प्रक्रियेसाठी RCB कडे आता 3.35 कोटी रुपये किंमत शिल्लक आहे. आरसीबीने 14 खेळाडूंना कायम ठेवले असून त्यामध्ये एका ट्रेड खेळाडूसह परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे लिलाव प्रक्रियेत आरसीबीचा संघा चार हिंदुस्थानी खेळाडूंना खरेदी करू शकतो. दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या संघात फारसे बदल झाले नाहीत. त्यांनी 14 खेळाडूंना कायम ठेवले असून त्यांच्याकडे लिलाव प्रक्रियेसाठी 2.65 कोटी रुपये इतकी रक्कम शिल्लक आहे.