बीड : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. जुने-पुराने कारनामेही उकरुन काढण्यात येत आहेत,अनेकांचे जुने व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आणले जात आहेत. त्यातच बीड जिल्ह्यातील नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्यावर ऐन निवडणुकीत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दिवंगत नेते प्रवीण महाजन यांची पत्नी सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे (Pankaja munde) यांच्यावर गंभीर आरोप केले. दोन्ही मुंडे बहीण भावाने संगनमताने धाक दाखवून आणि कारस्थान रचून जबरदस्तीने कोट्यवधी रुपयांची जमीन अल्प किमतीत खरेदी केली असल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला आहे. मात्र, या आरोपाच्या घटनेत नवा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, सारंगी महाजन यांनी ज्यांचा संदर्भ देत हे आरोप केले, त्या गोविंद मुंडेंनी हा व्यवहार महाजन कुटुंबीयांच्या संमतीनेच झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांच्या माध्यमातून जबरदस्तीने जमीन नावावर करून घेतल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला आहे. आता, ज्यांच्या माध्यमातून हा व्यवहार झाला ते गोविंद मुंडे माध्यमाच्या समोर आले असून हा व्यवहार सारंगी महाजन यांच्याच संमतीने झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच, याप्रकरणी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांचाही संबंध नसल्याचं देखील मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे, याप्रकरणाचा विषय संपुष्टात आला आहे, मात्र यावर धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे काय बोलतील हे पाहावे लागेल. सारंगी महाजन या नात्याने मुंडे बंधू-भगिनींच्या मामी आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांच्याकडून जबरदस्तीने गोविंद मुंडे यांच्या माध्यमातून जमीन लिहून घेतल्याचा आरोप त्यांनी केला होता, त्यावर गोविंद मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
प्रवीण महाजन यांच्या नावे असलेली बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामधील मौजे जिरेवाडी येथील गट नंबर 240 मधील करोडो रुपये किमतीची 36.50 आर जमीन धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी जबरदस्तीने घेतली असल्याचं सारंगी महाजन यांनी म्हटले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले आहेत. सारंगी महाजन यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यावर आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे काय उत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
परळीत माझी 63.50 आर जमीन होती, 36 आर जमीन फ्रॉड करुन विकली. मला परळीच्या अनुसूया हॉटेलमध्ये बोलावून घेतले. मला तिथून रजिस्ट्रार ऑफिसला नेले. तिकडे माझ्याकडून सही करुन घेण्यात आली. कोणी जमीन घेतली, हे आम्हाला माहिती नाही. तिकडून आम्हाला गोविंद बालाजी मुंडेने घरी नेले, जेवू घातले. त्यानंतर ब्लँक पेपरवर सह्या घेतल्या. त्याला मी विरोध केला असता त्याने म्हटले की, सही केल्याशिवाय धनुभाऊ तुम्हाला परळी सोडून देणार नाहीत, अशी धमकी दिल्याचे सारंगी महाजन यांनी म्हटले. गोविंद बालाजी मुंडे याने आम्हाला ठाण्यातील घरी आणून सोडले. त्यानंतर आमच्याकडून त्याने एक लाख रुपये घेतले, असेही सारंगी महाजन यांनी सांगितले होते.