शंभरी ओलांडलेल्या महिला सर्वाधिक
esakal November 08, 2024 02:45 AM

पुणे, ता. ७ : पुण्यात शंभरी पार केलेल्या मतदारांमध्ये सर्वाधिक संख्या ही महिलांची आहे. पुरुष मतदारांपेक्षा १३८ महिला मतदारांची संख्या जास्त आहे. तर २१ विधानसभा मतदारसंघात पाच हजार मतदार हे शंभरपेक्षा अधिक वयाचे आहेत. शंभरीपार झालेले सर्वाधिक मतदार कोथरूड भागात वास्तव्यास आहेत.

ज्येष्ठांना घरात मतदानाची सुविधा
ज्येष्ठांना घरातून मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, त्याशिवाय विना अडथळा मतदान करता यावे, यासाठी प्रशासनाने मतदान केंद्रांवर सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, चिंचवड आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात शंभरी ओलांडलेल्या पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. सर्वाधिक कोथरूड विधानसभा मतदारसंघात ५६५ तर सर्वात कमी मावळ मतदारसंघात ८१ मतदार आहेत. ८५ पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना घरातूनच मतदान करण्याचा पर्याय दिला होता, त्यासाठी एक हजार ९२५ मतदार पात्र ठरले आहेत. त्यांना घरातून मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

खुर्ची आणि मदतनीस
प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्यांना चाकाच्या खुर्चीची व्यवस्था असेल, त्याचबरोबर रॅम्प तयार करण्यात येणार आहेत. शिवाय ज्येष्ठांच्या मदतीसाठी मदतनीस उपलब्ध राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.


८८ लाख ४९ हजार ५९०
- २१ मतदारसंघांत मतदार नोंदणी

५ हजार २३१
- शंभरी ओलांडलेल्या मतदार

२ हजार ५४६
शंभरपेक्षा अधिक वय पुरुष

२ हजार ६८४
शंभरपेक्षा अधिक वय महिला


४५ लाख ७९ हजार २१६
- एकूण पुरुष मतदार

४२ लाख ४९ हजार ५६९
- एकूण महिला मतदार

८०५
- तृतीयपंथी मतदार

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.