Sharad Pawar: आमच्या शेतकऱ्याला मिळते ती थकबाकीदाराची पदवी; शरद पवारांनी व्यक्त केली खंत
esakal November 08, 2024 02:45 AM

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार विदर्भ दौऱ्यावर असून, काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सलील देशमुख यांच्या प्रचारार्थ त्यांनी सभा घेतली. या सभेत शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर रोखठोक भाष्य केले आणि शेतकऱ्यांच्या कर्जबाजारी स्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कर्जमाफीचा मुद्दा-

म्हणाले, "ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. काटोल मतदारसंघ हा शेतकऱ्यांचा, शेती करणाऱ्या लोकांचा मतदारसंघ आहे. मी १० वर्षे शेती खात्याचे काम पाहिले आहे. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रश्न समोर आले. त्या वेळी आत्महत्या केलेल्या कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे काम केले, आणि त्यावेळी ७१ हजार कोटींची कर्जमाफी केली होती."

पवार यांनी स्पष्ट केले की, आजही शेतकऱ्यांची स्थिती गंभीर आहे. शेतकऱ्याला थकबाकीदाराची "पदवी" मिळते, ज्यात त्यांची काही चूक नसते. याचे मुख्य कारण म्हणजे शेतमालाला योग्य किंमत न मिळणे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या आधारे हमीभाव देण्याची आवश्यकता आहे, आणि कर्जमाफी ही त्यांच्या अडचणींवर तात्पुरता उपाय आहे.

केंद्र सरकारवर टीका-

शरद पवारांनी केंद्र सरकारवर टीका करताना सांगितले की, "केंद्राने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार शेतकऱ्यांची स्थिती उध्वस्त झालेली आहे. आजच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीही केलेले नाही. उलट, संत्र्यांच्या निर्यातीवर निर्बंध लावल्यामुळे संत्र्यांचे दर घटले, ज्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला आहे."

मतदारांना आवाहन-

शरद पवारांनी मतदारांना लक्ष देऊन मतदान करण्याचे आवाहन केले. "नाशिकमध्ये तुतारी आणि पिपाणीच्या चुकीमुळे ८०,००० मते वाया गेली. अशा परिस्थितीचा पुनरावृत्ती होऊ नये म्हणून, आपण सजग राहावे," असे ते म्हणाले.

महाविकास आघाडीच्या सत्तेसाठी समर्थन

पवार यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या समर्थनासाठी आवाहन करताना, सामान्य लोकांसाठी योजना राबविण्याची आणि महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याची गरज असल्याचे म्हटले. अनिल देशमुखांवर झालेल्या अन्यायाचा उल्लेख करत पवार म्हणाले, "अनिल बाबूने खोट्या आरोपांचा विरोध करण्याचे धाडस दाखवले आहे, आणि महाराष्ट्रात त्यांचा सन्मान राखला."

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.