नाशिक : महापालिका हद्दीतील रुग्णालये नियमात आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने नियुक्त केलेल्या पथकाला २५० रुग्णालयाकडून सहकार्य मिळाले. मात्र साडेतीनशे रुग्णालयाकडून कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने या रुग्णालयांना वैद्यकीय विभागाकडून नोटीस पाठविण्यास सुरवात करण्यात आली आहे. सात दिवसात रुग्णालयांनी कागदपत्रे सादर न केल्यास रुग्णालयांचा परवाना रद्द केला जाणार आहे. (350 hospitals in city refuse to give non cooperative documents to municipal corporation )
महात्मानगर येथील पंड्या हॉस्पिटलमध्ये अवैध गर्भपात केंद्र सुरू असल्याचा प्रकार सप्टेंबर महिन्यात उघडकीस आला. प्राप्त तक्रारीनुसार महापालिकेने टाकलेल्या छाप्यामध्ये गर्भपातासाठी लागणारी औषधे तसेच इतर साहित्य आढळून आले. रुग्णालयातील डॉक्टरांवर गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याच अनुषंगाने महापालिकेने शहरातील इतर रुग्णालयांची तपासणी सुरू केली.
शहरात जवळपास ६०० रुग्णालये आहेत. त्यातील अडीचशे रुग्णालयाकडून वैद्यकीय विभागाने नियुक्त केलेल्या पथकाला कागदपत्रे पुरविण्यात आले. मात्र साडेतीनशे रुग्णालयाकडून अद्यापही कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. पथकाकडून रुग्णालयाच्या दर्शनी भागात रुग्ण हक्क सनद व उपचार दर पत्रकाची माहिती लावणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे नियमित परवाना नूतनीकरण करणे आवश्यक आहे. रुग्णालयामध्ये मंजूर खाटा व्यतिरिक्त अतिरिक्त खाटा असू नये. ()
त्याचबरोबर अग्निरोधक यंत्रणा बसविणे आवश्यक आहे. या संदर्भातील कागदपत्रे पथकाकडून मागविले जात आहे. मात्र साडेतीनशे रुग्णालयाने कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे महापालिकेने अशा रुग्णालयांना महाराष्ट्र नर्सिंग होम ॲक्ट तसेच साथरोग अधिनियम १९६८ चे उल्लंघन करणारे नोटिसा पाठविल्या आहेत. रुग्णालयाकडून सात दिवसात खुलासा द्यावा. कागदपत्रे मिळाली नाही तर परवाना रद्द केला जाणार असल्याची नोटीस बजाविण्यात आली आहे.
''महापालिकेकडून शहरातील सोनोग्राफी केंद्र तसेच गर्भपात केंद्रे व रुग्णालयांची तपासणी केली जात आहे. अडीचशे रुग्णालयाकडून कागदपत्र देण्यात आली. मात्र जवळपास साडेतीनशे रुग्णालयांनी कागदपत्रे दिल्याने नोटीस बजावली जात आहे.''- डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य आरोग्य व वैद्यकीय अधिकारी, महापालिका.