श्रीरामपूर: ‘‘पूर्वी एकाच कामाचे दहादहा वेळा भूमिपूजने व पोते भरून नारळ फोडण्याचा कार्यक्रम बंद झाला. कामे न करताच बिले काढली जात होती. हे सर्व थांबवून विकास कामे करताना आपण त्यात पारदर्शकता आणली. जे काम आहे त्याचे फलकही लावले. त्यामुळे अनेकांची दुकाने बंद झाली. तो पोटशूळ कटकारस्थाने करून माझी उमेदवारी घालविण्यापर्यंत झाला, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट)उमेदवार आमदार लहू कानडे यांनी विरोधकांवर केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज (ता.६) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तसेच श्रीरामपूर विधानसभेच्या घोषणापत्राचे प्रकाशन ऑडिओ-व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आले. याचवेळी काँग्रेस भवन येथे श्रीरामपूर विधानसभा घोषणापत्राचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत कानडे बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते अविनाश आदिक, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, प्रदेश सरचिटणीस अरुण नाईक, कैलास बोर्डे, राजेंद्र पवार, प्रकाश ढोकणे, अर्चना पानसरे, शिवाजी गांगुर्डे, मिस्टर शेलार, शिवाजी पवार, साजिद मिर्झा, सागर मुठे, विश्वनाथ आवटी, मल्लू शिंदे, पी. एस. निकम, उत्तमराव पवार, भागचंद औताडे, मंदा गवारे, प्रियंका जनवेजा, रुबिना पठाण आदी उपस्थित होते.
कानडे म्हणाले, विधिमंडळात श्रीरामपूर जिल्हा व्हावा, अशी मागणी करणारा मी पहिला आमदार आहे. श्रीरामपूर हेच जिल्ह्याचे मुख्यालय असावे, यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत. श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे हे आपले स्वप्न आहे.
चांगला आमदार मिळणार : आदिक
अविनाश आदिक म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा राज्यात एकाच वेळी प्रसिद्ध केला. लहू कानडे यांच्या रूपाने चांगला आमदार मिळणार आहे. त्यांना पुन्हा संधी दिली जाणे हे आपले भाग्य राहील. त्यामुळे निवडणुकीत त्यांना मताधिक्याने विजयी करावे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#ElectionWithSakal