Ahmednagar City Assembly constituency 2024: संग्राम जगताप यांना शहर भाजपचे समर्थन; पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय..
esakal November 07, 2024 08:45 PM

अहिल्यानगर: भाजपची काही ध्येयधोरणे आहेत. त्यानुसारच काम करून निर्णय घेण्यात येतात. आजपासून महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना शहर भाजपचे अधिकृतरित्या समर्थन देण्यात येत आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत निःस्वार्थ, निरपेक्षपणे, सचोटी व प्रामाणिकपणे काम करून जगताप यांच्यामागे उभे रहावे. त्यांच्या विजयासाठी योगदान द्यावे. महायुतीमधील घटक पक्षांना बरोबर घेत कोणत्याही प्रकारचा संभ्रम न ठेवता जास्तीत जास्त प्रचार व काम करू, असे प्रतिपादन शहर भाजपचे अध्यक्ष ॲड. अभय आगरकर यांनी केले.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत शहर भारतीय जनता पक्षाने महायुतीचे उमेदवार जगताप यांच्या प्रचारात सक्रिय होण्याचा निर्णय मंगळवारी बैठकीत जाहीर केला. जगताप यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आगरकर यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रचारात सक्रिय होण्याच्या सूचना केल्या.

यावेळी ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, विधानसभा निवडणूक प्रमुख व महायुतीचे समन्वयक महेंद्र गंधे, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, शहर जिल्हा सरचिटणीस सचिन पारखी, प्रशांत मुथा, जिल्हा उपाध्यक्ष अनिल मोहिते, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, सरचिटणीस महेश नामदे, प्रदेश सदस्या सुरेखा विद्ये, महिला आघाडी प्रमुख प्रिया जानवे, सविता कोटा, पंडित वाघमारे, बाळासाहेब भुजबळ, मयूर बोचूघोळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

भाजप आमचा मोठा भाऊ

भारतीय जनता पार्टीने मला समर्थन देण्याचे जाहीर केल्याबद्दल आभार व्यक्त करतो. राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही सर्वत जास्त महायुतीचेच उमेदवार निवडून येतील, यात शंका नाही. भाजप हा राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा भाऊ आहे. या निवडणुकीत भाजपने मोठ्या भावाप्रमाणे मदत करावी, असे आमदार संग्राम जगताप म्हणाले.

#ElectionWithSakal

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.