Sidhu Moosewala : दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या (Sidhu Moosewala) पालकांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाचे यावर्षी IVF द्वारे स्वागत केले. सिद्धू मूसेवालाच्या धाकट्या भावाचे नाव शुभदीप आहे. नुकतच सिद्धूच्या आईवडिलांनी त्याच्या भावाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सिद्धू मूसवालाच्या आई-वडिलांनी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फॅमिली फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये गायकाचे वडील बलकौर सिंह आणि आई चरण कौर त्यांचा धाकटा मुलगा शुभदीपसोबत पोज देताना दिसत आहेत. शुभदीपने फिकट निळ्या रंगाचा शर्ट, जीन्स आणि डोक्यावर गुलाबी पगडी घातलेली दिसतेय.
या फोटोसोबत सिद्धू मुसेवालाचं गाणं लावण्यात आलं आहे. पोस्टसोबतचं कॅप्शन हे पंजाबीमध्ये लिहिलंय. 'त्या डोळ्यांमध्ये एक अनोखी चमक आहे. जी आपल्या आयुष्यातील प्रत्येक सत्य समजून घेते. चेहऱ्यावरच्या निरागसतेच्या पलीकडे आणि शब्दांच्या पलीकडे एक अनमोल चमक आहे, जी आपल्याला नेहमी जाणीव करुन देते की, तो चेहरा आपल्यासोबतच आहे. एकदा अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी देवाच्या स्वाधीन केलेला तो आता छोट्या स्वरुपात परत आला आहे, देवाच्या कृपेने आणि आपल्या सर्व बंधू-भगिनींच्या प्रार्थनेने आपण वाहेगुरूंचे सदैव ऋणी राहू.
बलकौर सिंह आणि चरण कौर सिंह दुसऱ्यांदा आई-बाबा झाले. सिद्धू मूसेवालाची आई जुळ्या मुलांना जन्म देणार असल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर बलकौर यांनी ही अफवा असल्याचं सांगितलं होतं.
सिद्धू मुसेवालाची 29 मे 2022 रोजी हत्या करण्यात आली होती. गोल्डी बरार आणि लॉरेन्स बिश्नोई यांनी ही हत्या केल्याचं समोर आलं होतं. त्याच्या हत्येनंतर त्याचे आई-वडील मात्र एकटे पडले होते. त्यामुळे IVF च्या मदतीने त्यांनी पुन्हा पालक होण्याचा निर्णय घेतला. आता मुसेवाला घराण्याला मिळालेल्या नव्या वारसदाराची चर्चा आहे. सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सिद्धूला भाऊ झाल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मुसेवालाचा नवा वारसदारदेखील गायक व्हावा, अशी इच्छा ते व्यक्त करत आहेत. सिद्धूच्या निधनाला दोन वर्ष पूर्ण होणार आहेत. पण आजही त्याची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. त्याची गाणी चाहते आवडीने ऐकतात.
View this post on Instagram