पिंपरी, ता.७ ः स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शर्वरी डिग्रजकर - पोफळे यांनी आपल्या शास्त्रीय गायनाची सुरुवात राग पुरिया कल्याणने केली. त्यानंतर, मत्स्यगंधा नाटकातील नाट्यपद सादर केले. ‘आम्हा न कळे ज्ञान’ या अभंगाने सांगता केली. त्यांच्या गायनाने उपस्थित रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. त्यांना तबल्यावर रोहित कुलकर्णी आणि हार्मोनियम साथ राजीव तांबे यांनी केली.
कार्यक्रमाचा प्रारंभ स्नेहल सोमण यांच्या नृत्यरंग सादरीकरणाने झाला. सोमण आणि त्यांच्या शिष्यांनी शिखर अनवट ताल, ठुमरी, पंच महाभूत प्रस्तुती, सरस्वती वंदना, अष्टपदी आणि शेवट फ्यूजन प्रकाराने शेवट केला.
‘पंचतुंड नररुंड’ची नांदी
कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात ‘स्वर स्वप्न’ व्हायोलिन समुहाने आपले सादरीकरण केले. गुरू स्वप्ना दातार यांच्या सुश्राव्य निवेदनाखाली संपूर्ण शिष्यवर्गाने हा कार्यक्रम सादर केला. सादरीकरणाची सुरुवात ‘पंचतुंड नररुंड’ या नांदीने झाली. त्यानंतर, शिष्य समूहाने रागमाला, भूप, सूलताल, भीमपलास, किरवाणी, तुर्कीश मार्च सादरीकरण केले. त्यानंतर, भक्तीसंगीत अभंग, देशभक्तिपर गीते, लोकसंगीत आणि शेवटी ‘सूरत पिया’ या प्रसिद्ध गाण्याने सांगता केली. मनोज देशमुख, रोशन चांदगुडे (तबला), भागवत चव्हाण (पखवाज), शुभम शहा (ताल वाद्य), तुषार देशपांडे (ड्रम्स), तुषार दीक्षित (की-बोर्ड) यांनी साथसंगत केली. नामदेव पानगरकर यांनी ध्वनी नियंत्रण केले. अभिजीत कोळपे यांनी सूत्रसंचालन केले.