दिव्यांग अमोलची दिव्यांगांसाठी अनमोल कामगिरी
esakal November 08, 2024 03:45 AM

कोथरूड, ता. ७ ः डॉक्टरांनी उपचारात केलेल्या चुकीमुळे वयाच्या चौथ्या वर्षी पोलिओ झालेल्या अमोल शिनगारेच्या नशिबी अपंगत्व आले. घरची परिस्थिती हालाखीची असल्याकारणाने तशा अवस्थेतही विविध कामे करत अमोलने शिक्षण घेतले. दुःखाला मित्र मानून, त्याने समस्येलाच साधन बनवत जीवनात आनंदाचे क्षण निर्माण केले. एवढेच नव्हे, तर अन्य दिव्यांगांच्या जीवनातदेखील आनंद निर्माण केला.
संत ज्ञानेश्वर नगर एरंडवणा येथे राहणाऱ्या अमोलने अपंगत्व आणि गरिबीचा आपल्या शिक्षणावर परिणाम होऊ दिला नाही. गाडी पुसणे ते सोसायटीमधील प्रत्येक घरातील कचरा गोळा करणे, यांसारखी मिळेल ती कामे करत शिक्षण घेतले. प्रगतीसाठी त्याची चाललेली धडपड पाहून लोकांनीही त्याला सहकार्य केले. जीवनातील सकारात्मकता स्वीकारत अमोलने प्रगती केली. सध्या अमोल अनेक दिव्यांगांना सोबत घेऊन एकमेकांना आधार देण्याचे काम करीत आहे.
अमोल शिनगारेने सांगितले की, शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले. त्यात अनेक अडचणी आल्या. अशातच एक अपघात झाला. त्यात चेहऱ्यावर मोठी दुखापत झाली. १६ ठिकाणी फॅक्चर्स झाले. शस्त्रक्रिया झाल्यावर दिव्यांगांसाठी रोजगार मेळावा असल्याचा निरोप मिळाला. या मेळाव्यामध्ये जाण्याचे धाडस केले आणि जीवन बदलले. अमोलला महिंद्रा कंपनीमध्ये नोकरी मिळाली. महिंद्रा कंपनीत २००९ मध्ये रुजू झाल्यावर जीवनात स्थिरता आली. आई-वडील, पत्नी व दोन मुलांसोबत सुखाने संसार सुरू आहे.

माझ्यावर जी वेळ आली, ती इतरांवर येऊ नये, म्हणून दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी २०१४ साली सामाजिक क्षेत्रात उतरलो. समाजातील खूप साऱ्या दानशूर व्यक्ती, महिंद्रामधील सर्व मित्र, महाविद्यालयातील सहकारी आदींनी या कामात वेळोवेळी मदत केली. वेलोसिटी केअरचे विजय कुलकर्णी यांनी आम्हा दिव्यांगांना मदत दिली. यातून प्रेरणा घेत आम्ही ‘एनेबलर चॅरिटेबल ट्रस्ट’ सुरू केले. त्यातून दिव्यांगांसाठी काम सुरू आहे.

ट्रस्टचे उपक्रम...
दिव्यांगांसाठी विविध कौशल्य विकास कार्यशाळा आणि परिसंवाद आयोजित करणे
दिव्यांगांना व्हीलचेअर, कृत्रिम अवयव, श्रवणयंत्रे इत्यादी सहाय्यक उपकरणांचे वितरण
दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन. जिम आणि तांत्रिक अभ्यासक्रम सुरू करणे
दिव्यांग पदवीधरांसाठी निवारा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.