सोलापूर : गुंठेवारी खरेदी-विक्री मोजणी नकाशा व मूळ मालकीच्या कागदपत्रांमध्ये अडकली आहे. तरीपण, भविष्यात निश्चितपणे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून गुंठेवारीला परवानगी मिळेल, या आशेवर पाच-सहा वर्षांपूर्वीच हजारो लोकांनी कोट्यवधी रुपये गुंतवून शहराच्या हद्दवाढ भागात मोकळ्या जागा घेतल्या. त्या नोटरीच्या आधारावर अनेकांनी त्या जागांवर पक्की घरे देखील बांधली. सद्य:स्थितीत शहरातील नोटरीच्या जागांवर २६ हजारांहून अधिक लोक महापालिकेला टॅक्स भरतात, तरीपण त्यांना जागेची मूळ मालकी मिळालेलीच नाही, अशी वस्तुस्थिती आहे.
सोलापूर शहरात अपेक्षित रोजगार तथा नोकरीच्या संधी नसल्याने दरवर्षी शेकडो अभियंते सोलापूरमधून स्थलांतर करतात. अशा स्थितीतही सोलापूरचा विस्तार होतोय, पण गुंठेवारीला परवानगी नसल्याने अनेकांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. सन २००० च्या सुमारास काही हजारात मिळणाऱ्या गुंठ्याला आता लाखो रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे अनेकजण नोटरी करून जागा घेत आहेत, पण वेळेत खरेदी-विक्री न झाल्याने तीच जागा मूळ मालक दुसऱ्यालाच विकतोय. अशी भांडणे पोलिस ठाण्यापर्यंत पोचत आहेत.
दुसरीकडे टॅक्स विभागात नोंद झाल्यानंतरही मूळ मालकाने ती जागा दुसऱ्याला विकल्याने तो भोगवटदार महापालिकेत भांडायला येतोय, असेही अनुभव अधिकाऱ्यांनी सांगितले. कधी कधी मूळ मालक पूर्वीच्या नोटरीधारकाचे नाव काढावे म्हणूनही महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी भांडतोय, असेही प्रकार घडत असल्याचेही अधिकारी म्हणाले. यावर ठोस तोडगा काढावाच लागेल, अन्यथा भविष्यात जागांच्या कारणातून गुन्ह्यांचे प्रमाण वाढू शकते, असे पोलिसांत दाखल फिर्यादींवरून स्पष्ट होते.
लोकप्रतिनिधी सोडविणार का गुंठेवारीचा तिढा?
सोलापूर शहरातील शहर उत्तर आणि दक्षिण सोलापूर (शहरी भाग) या दोन विधानसभा मतदारसंघातील हद्दवाढ भागात विशेषत: विडी घरकूल, बाळे, शेळगी, तुळजापूर रोड, मजरेवाडी, जुळे सोलापूर या परिसरात गुंठेवारीचा प्रश्न ज्वलंत आहे. अनेक सामान्य नागरिकांनी एक-दोन गुंठे जागा नोटरीवर घेतल्या आहेत. अनेकजण त्याठिकाणी घरे बांधून रहात आहेत तर अनेकजण जागा मालकीची झाली नसल्याने भाड्याने दुसरीकडे रहायला आहेत. या नागरिकांचा प्रश्न नूतन आमदार सोडविणार का, याकडे सर्वांची उत्सुकता लागली आहे.
नोटरीनंतर भोगवटदार म्हणून टॅक्ससाठी लावली जाते नोंद
मूळ मालकाकडून एखाद्याने नोटरीवर जागा घेतली तर तो पूर्णपणे मालक होत नाही, जोवर उपनिबंधक कार्यालयातून त्या जागेची रितसर खरेदी होत नाही. तरीपण, मूळ मालक किंवा नोटरी केलेला व्यक्ती महापालिकेच्या टॅक्स विभागाकडे नाव नोंदवू शकतो. अशा पद्धतीच्या महापालिकेकडे तब्बल २६ हजारांहून अधिक जणांनी टॅक्स विभागाकडे नावे नोंदवली आहेत. पण, नोटरीवरून टॅक्स विभागाकडे लागलेल्या नोंदी पुन्हा रद्द होतच नाहीत. एकाशी नोटरी केलेली असतानाही ती जागा दुसऱ्याला विकली, तरीदेखील पूर्वीच्या भोगवटदाराला टॅक्स भरावाच लागतो, असेही महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.
महापालिकेच्या टॅक्सची सद्य:स्थिती
एकूण मिळकतदार
२.७० लाख
अपेक्षित वार्षिक टॅक्स
१७० कोटी
नोटरीवरील अंदाजे नोंदी
२६,०००