पाकिस्तानची झोप उडाली, तालिबानी संरक्षणमंत्र्यास भेटले भारतीय अधिकारी, परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांची खेळी काय?
GH News November 08, 2024 03:14 PM

India Afghanistan: भारत आणि अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार येण्यापूर्वी चांगले संबंध होते. त्यानंतर भारताने सावधपणे पावले उचलली. परंतु आता तालिबान सरकार भारतासोबत जुळवून घेत आहे. त्यामुळे भारतीय पराराष्ट्र मंत्रायलाने तालिबान सरकारशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. तालिबान सरकार आल्यानंतर प्रथमच भारतीय पराराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी तालिबान सरकारमधील संरक्षणमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर पाकिस्तानची मात्र झोप उडाली आहे.

जे.पी.सिंग यांची भेट

परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव जे.पी. सिंग यांनी काबूलमध्ये तालिबानचे संरक्षण मंत्री मोहम्मद याकूब मुजाहिद यांच्याशी प्रथमच भेट घेतली. याकूब हे 1996 ते 2001 पर्यंत तालिबान गटाचा माजी सर्वोच्च नेता आणि अफगाणिस्तानचा अमीर मुल्ला उमर यांचा मुलगा आहे.जे. पी. सिंग हे परराष्ट्र मंत्रालयात अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इराण प्रकरणांचे प्रभारी आहेत.

मोदी सरकारकडून अफगाणिस्तानसोबतच्या संबंधांमध्ये प्रगती

ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानचे सरकार अफगाणिस्तानमध्ये आले. तालिबाने काबूलचा ताबा घेतला. तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध दूरावले होते. परंतु आता भारताला अफगाणिस्तानशी संबंध पुढे नेण्याच्या प्रयत्नात आहे. यामुळेच भारतीय अधिकाऱ्याने तालिबानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तकी आणि अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हमीद करझाई यांचीही भेट घेतली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सूचनेनुसार परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे एक शिष्टमंडळही त्यांच्यासोबत गेले आहे. तालिबान राजवट आल्यानंतर मोदी सरकार अफगाणिस्तानसोबतच्या संबंधांमध्ये पूर्ण प्रगती करत असल्याचे यावरून दिसून येते.

पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या

भारत आणि अफगाणिस्तानमधील नात्यांमुळे आता पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या आहेत. पाकिस्तानची झोपच उडली आहे. कारण पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचेमधील नाते चांगले नाही. दीड महिन्यांपूर्वी सप्टेंबरमध्ये पाकिस्तानने काबूलमधून आपला विशेष प्रतिनिधी माघारी बोलवला होता. तसेच दोन्ही देशांच्या सीमेवर अनेकदा चकमकी आणि गोळीबार होत असतो. भारत आणि अफगाणिस्तानमधील संबंध सुधारण्याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील, अशी भीती आता पाकिस्तानला वाटत आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.