अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
रवी मुंडे, एबीपी माझा November 08, 2024 11:43 PM

जालना: देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी आज प्रचाराचा शुभारंभ केला. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सभा घेत अमित शाहांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसेच, शिराळा येथील सभेत बोलताना महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण होईल, याचे संकेतही दिले आहेत. त्यामुळे, महायुतीमधील पुढचा मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल, तेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अमित शाहांच्या या वक्तव्यावरुन आता महायुतीमधील नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या असून महाविकास आघाडीमधील नेतेही यावरुन भाजपसहं त्यांच्या मित्र पक्षांना टोला लगावत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यानंतर आता शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवारावर जोरदार हल्लाबोल केला आहे. जालन्यातील परतूर येथील सभेतून उद्धव ठाकरेंनी बोचरी टीका केली. 

अमित शाह यांनी सांगलीतील सभेत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. तर, देवेंद्र फडणवीस हे भावी मुख्यमंत्री असल्याचे संकेत अमित शाह यांनी दिल्यानंतर मित्र पक्षाकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच, विरोधी पक्षातील जयंत पाटील व उद्धव ठाकरेंनीही यावरुन टीका केल्याचं दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असे संकेत केंद्रीय मंत्री अमित शाह वारंवार देत आहेत. याचा आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार विचार करतील, असे जयंत पाटील यांनी म्हटले. या विधानसभेनंतर त्यांना कोणतीही संधी असणार नाही हेच अमित शाह सातत्याने सांगत असल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला. माढा येथील सभेनंतर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनीही घणाघातील टीका करत एकनाथ शिंदे व अजित पवारांना लक्ष्य केलं आहे. 

तुम्ही लोकसभेत फटके दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमिच शाह भाजपवाल्यांना मलम लावायला महाराष्ट्रात आले आहेत, तुमच्या इंजिनाला लागलेली भ्रष्टाचाराची चाकं यावेळी पंक्चर होणार आहेत. 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला, त्याला बाजूला घेऊन त्यांच्या प्रचाराला येत, कोणत्या तोंडाने मत मागता?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतून केला आहे. तसेच, अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असे संकेत दिले होते. त्यावरूनही, उद्धव ठाकरेंनी बोचरी टीका केली.  आता मिंदे आणि अजित पवारांना भाजपवाले भांडी घासायला ठेवतात की नाही बघा, अशा शब्दात उद्धव ठाकरेंची भाजपवर पलटवार केला आहे. 

अमित शाह नेमकं काय म्हणाले

20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान होणार आहे. त्यामुळे या दिवशी आपल्या सगळ्यांना निर्णायक भूमिका घ्यायची आहे. मी दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना आणायचं आहे, अशी इच्छा महाराष्ट्रातील जनतेची आहे, असे अमित शाह म्हणाले. 

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.