नाशिक : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षक पात्रता परीक्षा शनिवारी (ता. १०) होणार आहे. या परीक्षेची तयारी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने केली आहे. यंदा प्रत्येक परीक्षार्थीची मेटल डिटेक्टर चाचणी होणार आहे. परीक्षार्थीचे बायोमेट्रिक व फेस स्कॅन केल्यानंतर परीक्षागृहात प्रवेश दिला जाणार आहे. जिल्ह्यात पेपर एकसाठी २१ केंद्रांवर आठ हजार ८८४ परीक्षार्थी व पेपर दोनसाठी ३४ केंद्रांवर १२ हजार ४२३ असे एकूण २१ हजार ८७ परीक्षार्थी प्रविष्ट झाले आहेत. (Candidates Biometric Face Scan TET Exam zp Prepared by Department of Primary Education)
परीक्षेसाठी जिल्हास्तरावरून झोनल अधिकारी, सहाय्यक परीक्षक व केंद्र संचालकांची नियुक्ती करून सहविचार सभा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे. शनिवारी पेपर एक सकाळी साडेदहा ते दुपारी एकपर्यंत व पेपर दोन दुपारी अडीच ते सायंकाळी पाचपर्यंत असणार आहे. वेळेपूर्वी २० मिनिटे अगोदर परीक्षागृहात उपस्थित असणे परीक्षार्थीला बंधनकारक आहे. परीक्षेत कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही, यासाठी परीक्षा परिषदेने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. ()
यात प्रत्येक केंद्रावर परीक्षागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. परीक्षागृहात कुठल्याही इलेक्ट्रॉनिक साधनांना घेऊन जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. परीक्षार्थीने परीक्षा वेळेपूर्वी ९० मिनिटे अगोदर केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. प्रत्येक केंद्रावर पोलिस बंदोबस्त पुरविण्यात आला आहे. परीक्षार्थींना ओळखीचा पुरावा अनिवार्य केला आहे. प्रवेशपत्रासोबत आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, निवडणूक ओळखपत्र यापैकी एखादे मूळ ओळखपत्र जवळ असणे आवश्यक आहे.
नावात बदल असलेल्या परीक्षार्थींनी राजपत्र, अधिसूचना, विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. पेपर दोनसाठी स्वतंत्र प्रवेशपत्र, स्वतंत्र बैठक क्रमांक असणार आहे. दिव्यांग परीक्षार्थींना दिव्यांगत्वचा लाभ घेण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. परीक्षेचे काटेकोर नियोजन केले असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांनी सांगितले.