राजेगाव, ता. ८ : राजेगाव (ता. दौंड) येथील वाघ परिवारातील परिवारातील आकाश दत्तात्रेय वाघ यांची नुकतीच पुणे ग्रामीण पोलिस दलात निवड झाली. त्यामुळे साहजिकच वाघांची दिवाळी यंदा गोड झाल्याचे दिसून येत आहे.
वाघ परिवाराचा व्यवसाय शेती. आकाशचे आई वडील दोघेही शेतीतच काबाडकष्ट करतात. घरातील कोणीच सरकारी नोकरीला नसल्याने आजोबा स्वर्गीय ईश्वर वाघ यांना नेहमी वाटायचे की, आपल्या घरातील मुले नाही लागली किमान नातवंडांनी तरी सरकारी नोकरी करावी. आजोबांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आकाशने कंबर कसली. प्राथमिक शिक्षण राजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण राजेश्वर विद्यालयात झाले.
आकाशचे मामा विक्रम मोरे सुरुवातीला सैन्यात होते. सेवानिवृत्त झाल्यावर आता पोलिस दलात आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन, मार्गदर्शन घेऊन सुरुवातीला सैन्यात भरती होण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु २१ वर्षे वयाची अट असल्याने अपयश आले. नंतर पोलिस दलात भरती होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. घरची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्यामुळे सुरुवातीला घरीच राहून गावामध्येच मित्रांबरोबर भरतीसाठी सराव सुरू केला. परंतु यश काही येत नव्हते. दोनवेळा फक्त एक दोन गुण कमी पडल्याने अपयश आले. शेवटी तिसऱ्या वेळी विद्या प्रतिष्ठानच्या पोलिस प्रशिक्षण केंद्रात एक वर्ष प्रवेश घेतला. आणि तिसऱ्या प्रयत्नात आकाश यशस्वी झाला. त्याची नुकतीच पुणे पोलिस दलात नियुक्ती झाली आहे. दिवाळीच्या सुट्टीला आकाश गावाला आला होता. घरात सगळीकडे आनंदीआनंद पसरला होता. एकप्रकारे यंदा वाघ परिवाराची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली होती.
आजोबा कै. ईश्वर वाघ यांची इच्छा होती की, घरातलं कोणीतरी सरकारी नोकरीला असावं. माझ्या यशात माझे मामा, सर्व कुटुंब, सर्व शिक्षक यांचा मोलाचा वाटा आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने यश नक्कीच मिळते.
- आकाश वाघ
मुलाने पोलिस व्हावे ही आमची तीव्र इच्छा होती. त्याला दोनवेळा थोडक्यात अपयश आले पण त्याने जिद्द सोडली नाही. आमच्या घरात कोणीही सरकारी नोकरीला नव्हते. त्यामुळे खूप आनंद होतोय.
- दत्तात्रेय वाघ, वडील