Assembly Election 2024 : पालघर जिल्ह्यात भाजपाला मोठा धक्का; कुणबी सेनेचा बहुजन विकास आघाडीला पाठिंबा
esakal November 09, 2024 03:45 AM

विरार - विधानसभेच्या निवडणुकीला आता रंग चढू लागला आहे. या अगोदर लोकसभेला भाजपच्या बरोबर असलेल्या कुणबी सेनेने यावेळी पालघर जिल्ह्यात वेगळी भूमिका घेतली असून, त्यांनी भाजप ऐवजी बहुजन विकास आघाडीला आपला हात दिल्याने भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

कुणबी सेनेचे सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील व इतर पदाधिकाऱ्यांनी आज विरार येथे आमदार हितेंद्र ठाकुरांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पालघर जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख अविनाश पाटील, सरचिटणीस विवेक पाटील, प्रकाश बारे (अध्यक्ष, मुंबई), वाडा तालुका प्रमुख प्रल्हाद शिंदे, पालघर तालुका प्रमुख अरविंद उंडी, डहाणू तालुका प्रमुख जितेंद्र कोरे, विक्रमगड तालुका प्रमुख रणधीर पाटील, युवा दल प्रमुख प्रशांत सातवी, पालघर तालुका उपजिल्हा प्रमुख दिनेश पावडे, ज्येष्ठ नेते गंगाराम घरत, युवा नेते आकाश बारे उपस्थित होते.

कुणबी सेनेच्या पाठिंब्यामुळे बहुजन विकास आघाडीला पालघर जिल्ह्यात फायदा होणार आहे. पालघर जिल्ह्यात कुणबी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. काही दिवसांपूर्वी पालघरच्या विक्रमगड येथे कुणबी सेनेची चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. तसेच विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली होती.

महायुतीने कुणबी सेनेला दिलेली आश्वासने पाळली नसल्याने कुणबी सेनेने भाजपाचा पाठींबा काढून घेतला होता. त्यानंतर आज कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांनी बहुजन विकास आघाडीला पाठींबा दिला आहे. पालघर जिल्ह्यात भाजपासाठी हा मोठा धक्का मानला जातो.

#ElectionWithSakal

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.