देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपला ३० वर्षानंतर सोलापुरात रेकॉर्ड करण्याची संधी! २०१४ मध्ये ७ जागा लढूनही २ तर २०१९ मध्ये ५ पैकी ५ जागांवर मिळाले यश, आता २०२४ मध्ये काय?
esakal November 09, 2024 04:45 AM

सोलापूर : भाजपने सोलापूर जिल्ह्यात १९९० मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार उभे केले. त्यानंतर २०१९ मध्ये पाच आमदारांच्या रूपाने भाजपला जिल्ह्यातील सर्वात मोठे यश मिळाले. तत्पूर्वी, २०१४ मध्ये बार्शी, मोहोळ, शहर उत्तर, शहर मध्य, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर व सांगोला, अशा सात ठिकाणी उमेदवार उभे करूनही अवघ्या दोनच जागा भाजपला जिंकता आल्या. त्यानंतर २०२४ च्या निवडणुकीत भाजपने स्वत:च्या चिन्हावर सहा उमेदवार मैदानात उतरविले असून, त्या सर्व जागा जिंकल्यास भाजप मागील ३० वर्षांचे रेकॉर्ड तोडेल. त्या माध्यमातून नवा रेकॉर्ड प्रस्थापित करण्याची संधी भाजपला आहे.

१९९० च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून अक्कलकोटमधून बाबासाहेब तानवडे, सांगोल्यातून भानुदास कोळेकर, माळशिरसमधून सुभाष पाटील हे तिघे मैदानात होते. पण, त्यावेळी तिघांनाही यश मिळाले नाही. १९९५च्या निवडणुकीत मात्र, अक्कलकोटमधून तानवडे यांनी विजय खेचून आणला व जिल्ह्यात भाजपचे ते पहिले आमदार झाले. याच निवडणुकीत शहर दक्षिण मतदारसंघातून लिंगराज वल्याळ हे देखील आमदार झाले. पण, सांगोल्यातील डॉ. गणपतराव मिसाळ व माळशिरसचे उमेदवार सुभाष पाटील यांचा पराभव झाला. १९९९च्या निवडणुकीत अक्कलकोटमध्ये भाजपचे उमेदवार सुरेश पाटील यांचा पराभव करून सिद्धाराम म्हेत्रे आमदार झाले. शहर उत्तरचे उमेदवार किशोर देशपांडे, माळशिरसचे उमेदवार सुभाष देशमुख यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता.

आमदारांची संख्या दोनवरून पुन्हा एक झाली होती. २००४ मध्ये अक्कलकोटचे उमेदवार सिद्रामप्पा पाटील, शहर उत्तरमधून विजयकुमार देशमुख यांनी बाजी मारली. पण, सांगोल्यात शिवाजीराव गायकवाड, माळशिरसमध्ये अजितकुमार मोटे यांना पराभवाचा सामना करावा लागला. २००९ मध्ये शहर उत्तरमधून विजयकुमार देशमुख तर अक्कलकोटमधून सिद्रामप्पा पाटील दुसऱ्यांदा आमदार झाले. पण, पुन्हा भाजपला माळशिरसमध्ये पराभव पत्कारावा लागला. दिलीप कांबळे यांचा त्यावेळी पराभव झाला. २०१४च्या निवडणुकीत बार्शीत राजेंद्र मिरगणे, मोहोळमध्ये संजय क्षीरसागर, अक्कलकोटमध्ये सिद्रामप्पा पाटील, शहर मध्यमध्ये मोहिनी पत्की, सांगोल्यात श्रीकांत देशमुख यांना पराभव स्वीकारावा लागला.

२०१४च्या निवडणुकीत शहर उत्तरमध्ये विजयकुमार देशमुख तिसऱ्यांदा तर दक्षिण सोलापुरातून सुभाष देशमुख आमदार झाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २०१९ची निवडणूक पार पडली. त्यात सोलापूर जिल्ह्यातील शहर उत्तर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, माळशिरस, पंढरपूर-मंगळवेढा (पोटनिवडणूक) या पाच ठिकाणी भाजपचे आमदार विजयी झाले होते. आता २०२४ च्या निवडणुकीत किती उमेदवार निवडून येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ याशिवाय उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गजांच्या सभा सोलापुरात होणार आहेत.

सात निवडणुकांमध्ये भाजपचे केवळ १३ आमदार

१९९० ते २०१९ या सात निवडणुकांमध्ये (३० वर्षे) भाजपने ३० जागांवर उमेदवार उभे केले. त्यापैकी केवळ १३ जणांनाच यश मिळाले. त्यात विजयकुमार देशमुख चारवेळा, सुभाष देशमुख व सिद्रामप्पा पाटील प्रत्येकी दोनदा आमदार झाले. याशिवाय अन्य पाच उमेदवारांनाच विजय प्राप्त करता आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच २०१९च्या निवडणुकीत भाजपला पाच जागा जिंकता आल्या. या निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच सोलापुरात एवढ्या जागा जिंकल्या होत्या.

३० वर्षांत पहिल्यांदा माळशिरस जिंकले

विधानसभा निवडणुकीच्या ३० वर्षांत भाजपने माळशिरस मतदारसंघात सहावेळा उमेदवार मैदानात उतरवले. पण, त्यात भाजपला पहिल्यांदा मोहिते-पाटलांच्या साथीने राम सातपुते यांच्या रूपाने विजय मिळाला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.