वडगाव शेरी - कल्याणीनगरच्या पोर्शे कार अपघात प्रकरणी नाव घेतले तर न्यायालयात खेचीन, अशी नोटीस आमदार सुनील टिंगरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठवली आहे. म्हणून आता पोर्शे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण आणि तरुणीला जोपर्यंत न्याय मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. ‘पोर्शे’तील गुन्हेगारांच्या मागे तुम्हीच होता, असा घणाघाती हल्ला सुप्रिया सुळे यांनी आज झालेल्या प्रचार सभेत आमदार सुनील टिंगरे यांच्यावर केला.
महाविकास आघाडीचे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारासाठी येरवडा येथे झालेल्या सभेत सुळे बोलत होत्या. यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे, बापूसाहेब पठारे आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या, ज्या शरद पवार साहेबांनी मागील निवडणुकीकरता एबी फॉर्म वर सही करून सुनील टिंगरे यांच्या हातात फॉर्म दिला. त्यांनीच आज पवार साहेबांना नोटीस पाठवली आहे. हिम्मत असेल तर न्यायालयात खेचूनच दाखवा.
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, एकदा विकलेला माल दुकानदार पुन्हा घेत नाही. तर विकला गेलेला आमदार पुन्हा निवडून का द्यायचा. संपूर्ण राज्यात महिला सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. फडणीसांनी लाल रंगाच्या संविधानाला नक्षली म्हणणे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे.
यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. आजच्या सभेत माजी नगरसेवक हनिफ शेख, भाजपचे माजी नगरसेवक आयुब शेख आणि मनसेचे पदाधिकारी सादिक शेख यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
तर तुमचीही अंडीपिल्लं बाहेर काढू…
अजित पवारांनी वडगाव शेरीतील प्रचार सभेत बापू पठारे यांना दम दिला. यावर दादांचे नाव न घेता सुप्रिया सुळे म्हणाल्या, आम्हालाही तुमची अंडी पिल्ली माहीत आहेत. जुने कशाला बाहेर काढता. नाहीतर, 'यहा से भी करारा जवाब मिलेगा’